भंगलेले स्वप्न

0
2

अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो विदेशी नागरिकांवर नूतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हद्दपारीचा आदेश बजावला आहे. ज्या किमान चौदा लाख विदेशी नागरिकांवर ही हद्दपारीची टांगती तलवार लटकते आहे, त्यामध्ये 18 हजार भारतीय आणि 38 हजार चिनी नागरिक आहेत. अमेरिकेने नुकतीच 104 भारतीयांची परत पाठवणी लष्करी विमानातून आणि साखळदंडांनी जखडलेल्या स्थितीत केली. लाखो रुपये खर्चून पाहिलेले आपले अमेरिकन ड्रीम भंग पावल्याने हताश, निराश स्थितीत परतलेल्या ह्या भारतीयांनी सांगितलेल्या दलालांकडून झालेल्या त्यांच्या फसवणुकीच्या कहाण्या हादरवून सोडणाऱ्या आहेत. ह्या लोकांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना अमेरिकेत नेऊन पोहोचवण्याची आश्वासने देणाऱ्या दलालांनी त्यांना त्यासाठी जे दिव्य करायला लावले ते अक्षरशः थरकाप उडवते. अमेरिकेत नेऊन पोहोचवण्याचे आश्वासन देणाऱ्या ह्या दलालांच्या टोळ्यांनी ह्या लोकांना पनामा, कोस्टारिका, एल साल्वादोर, ग्वाटेमाला अशा देशांतून घनदाट जंगलांतून, डोंगरकपारींतून, दलदलींतून, खोल समुद्रातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करायला लावून मेक्सिकोत पोहोचवले आणि तेथून मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांमार्फत अमेरिकेत प्रवेश मिळवून दिला. हा त्यांचा प्रवास अत्यंत जीवघेणा होता. प्रतिकूल हवामान, दुर्गम भूभाग, हिंस्र श्वापदे आणि विषारी प्राण्यांचा सामना करीत ह्या लोकांना शेकडो किलोमीटरचा प्रवास उपाशीपोटी, भुकेलेल्या तहानलेल्या स्थितीत करावा लागला होता हे आता समोर आले आहे. अमली पदार्थ व्यवहार करणाऱ्यांपासून गुन्हेगारी टोळ्यांपर्यंत अनेक संकटांचा सामना ह्या प्रवासात करावा लागतो तो तर वेगळाच. ह्या भारतीयांमध्ये जसे तरूण होते, तशाच स्त्रिया आणि मुलेही होती. ह्या भयावह प्रवासात त्यांना वाटेतच मरण पावलेल्यांचे मृतदेहदेखील आढळले. अशा चोरमार्गांनी अमेरिकेत प्रवेश मिळवून देणाऱ्या संघटित आंतरराष्ट्रीय टोळ्या आहेत म्हणूनच अशी बेकायदेशीर कृत्ये होत असतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी येताच आपल्या देशाचा राष्ट्राभिमान जागवण्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक घोषणांपैकी बेकायदेशीर स्थलांतरितांची परत पाठवणी ही एक महत्त्वाची घोषणा राहिली आहे आणि प्राधान्यक्रमाने त्यानी ती अंमलात आणली आहे. मात्र, ज्या अमानवी पद्धतीने ही परत पाठवणी साखळदंडांनी जखडलेल्या स्थितीत आणि लष्करी विमानातून झाली आहे ती आक्षेपार्ह आहे. अशा प्रकारची परत पाठवणी ही काही नवीन नाही. ब्रिटन आणि अमेरिकेतून अशा प्रकारे बेकायदेशीर स्थलांतरितांना पूर्वीपासून परत पाठवले जात आले आहे. परंतु यापूर्वी खास विमानांतून त्यांची परत पाठवणी केली जात असे. ट्रम्प यांनी मात्र, त्या स्थलांतरितांनाच नव्हे, तर त्यांच्या मूळ देशांना अवमानीत करण्यासाठी लष्करी विमानांतून आणि साखळदंडांनी जखडलेल्या स्थितीत त्यांना परत पाठवले आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून जारी केले आहेत. भारतासारखा देश अमेरिकेच्या दबावापुढे लाचार होऊन ही आपल्या नागरिकांची अत्यंत अपमानास्पद परत पाठवणी मुकाट सोसतो हे दुर्दैवी आहे. संसदेमध्ये ह्या विषयावर गदारोळ झाला तो त्यामुळेच. एरव्ही सदानकदा मानवाधिकारांची बात करीत आलेल्या अमेरिकेला ह्या परदेशस्थ नागरिकांच्या मानवाधिकारांशी काही देणेघेणे दिसले नाही. ह्यापैकी अनेक दलालांकडून फसवणूक झाल्यानेच ह्या गैरमार्गांनी अमेरिकेत प्रवेशले. त्यांच्याकडून लाखो रुपये दलालांनी घेतले. आपले घरदार गहाण ठेवून, जमिनी विकून, महागड्या व्याजदराचे कर्ज काढून ह्या नागरिकांनी दलालांकडे लाखो रुपये सुपूर्द केले होते. त्यांना चकवून, भूलथापा मारून ह्या दुर्धर मार्गांतून प्रवास करायला भाग पाडले गेले. अशा गैरमार्गांनी जे अन्य देशात जातात त्यांना इमिग्रेशन कोर्टापुढे उभे केले जात असते. आपल्याला आपल्या मायदेशात जिवाला धोका आहे हे जर सिद्ध करता आले तर असे स्थलांतरित राजाश्रयाची विनंती करू शकतात, अन्यथा त्यांची परत पाठवणी अटळ असते. अमेरिकेने चालवलेली ही परत पाठवणी बेकायदेशीर म्हणता येत नाही, परंतु ज्या तऱ्हेने ती चालली आहे ती पद्धत चुकीची आहे. आपल्या भारतामध्ये अनेक विदेशी नागरिक व्हिसाची मुदत संपल्यावरही वास्तव्य करताना दिसतात. गोव्यात तर यापैकी अनेकजण येथे व्यवसाय करतानाही आढळले. त्यांच्या परत पाठवणीसाठी जी तत्परता दाखवली जायला हवी ती आपल्याकडे दाखवली जात नाही. लाखो बांगलादेशी भारतात पसरले आहेत. अमेरिकेप्रमाणे हडेलहप्पीने नव्हे, परंतु येथे बेकायदा वास्तव्य करून राहिलेले बांगलादेशी आणि अन्य विदेशींची परत पाठवणी भारत सरकारने वैध मार्गांनी आणि रीतसर करायला काय हरकत आहे.