मुख्यमंत्री; नागरिकांना 4 तास पाणी पुरवू
राज्यातील नागरिकांना 24 तास पाण्याचा पुरवठा करणे सध्या शक्य नसले, तरी किमान 4 तास पाणीपुरवठा केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत काल दिली. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
राज्यात पाण्याची मागणी वाढत आहे. राज्य सरकारकडून सर्वांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जात आहे. तिळारी धरणाचा कालवा फुटल्याने उत्तर गोव्यात पाण्याची समस्या निर्माण झाली होती. कालव्याची दुरुस्ती करण्यात आली असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी चर्चेदरम्यान सांगितले.
राज्यातील किनारी भागातील पाण्याच्या आवश्यकतेचा आढावा घेऊन पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. ‘हर घर जल’ ही योजना राबविणारे गोवा हे एकमेव राज्य आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. डिचोली, मये, जुने गोवे, पर्वरी, चिंबल आदी भागात पाण्याचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील नागरिकांना 24 तास पाण्याचा पुरवठा कधी केली जाणार, अशी लक्षवेधी सूचना आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मांडली होती.