डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. अमेरिकेने बुधवारी त्यांच्या देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 104 भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवले होते. आता ते अशा पद्धतीने अमेरिकेत राहणाऱ्या आणखी 487 भारतीयांना माघारी पाठवणार आहेत. याबाबत केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी माहिती देण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत या प्रकरणावर बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ही माहिती दिली. अमेरिकेने केंद्र सरकारला त्यांच्या देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 487 भारतीय नागरिकांची माहिती दिली असून, त्यांच्या हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.