विशेष रेल्वेतून गोमंतकीय भाविक महाकुंभ मेळ्यासाठी झाले रवाना

0
2

प्रयागराज-उत्तरप्रदेश येथील महाकुंभ मेळ्यासाठी गोव्यातील भाविकांना घेऊन जाणाऱ्या राज्य सरकारच्या पहिल्या खास रेल्वेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी करमळी रेल्वे स्थानकावर काल हिरवा झेंडा दाखविला.
यावेळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दिगंबर कामत, राजेश फळदेसाई, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व इतरांची उपस्थिती होती.
यानंतर राज्य सरकारकडून 13 आणि 21 फेब्रुवारीला आणखी दोन विशेष रेल्वेगाड्या प्रयागराजला रवाना केल्या जाणार आहेत. समाजकल्याण खात्याच्या मुख्यमंत्री देवदर्शन योजनेखाली खास रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

गोवा राज्य केवळ सूर्य, वाळू आणि समुद्रकिनारे यासाठीच नव्हे तर त्याच्या आध्यात्मिक महत्त्वासाठीही ओळखला जाणार आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रयागराज महाकुंभमेळ्यासाठी गोव्याच्या पहिल्या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बोलताना सांगितले.
गोव्यातील अनेक नागरिकांचे प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यासाठी उपस्थित राहण्याचे स्वप्न होते. राज्य सरकारच्या खास वाहतूक व्यवस्थेमुळे त्यांचे हे स्वप्न साकार होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाविकांना सुरळीत आणि आरामदायी अनुभव मिळावा यासाठी सरकारने प्रयागराजमध्ये वाहतूक आणि इतर सुविधांची योग्य व्यवस्था केली आहे. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांनी समाजकल्याण खात्याच्या संपर्क क्रमांकावर नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.