दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान

0
3

>> 70 जागांसाठी सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात मुख्य लढत

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज (दि. 5) एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात मुख्य लढत अपेक्षित आहे. प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, आज सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तसेच रांगेत उभ्या असलेल्या मतदारांसाठी अतिरिक्त तासभर मतदान होणार आहे. दरम्यान, ह्या निवडणुकीचा निकाल शनिवार दि. 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.

दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्या मते, 13,766 मतदान केंद्रांवर 1.56 कोटी मतदार मतदान करण्यास पात्र आहेत. त्यामध्ये 83.76 लाख पुरुष, 72.36 लाख महिला आणि 1,267 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी एकूण 733 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
गत लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडीचा भाग असलेले पाच पक्ष एकमेकांविरुद्ध दिल्ली विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यापैकी सर्व 70 जागांवर आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. त्याच वेळी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय) 6 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी (सीपीआय-एम) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी लेनिनवादी (सीपीआय-एमएल) यांनी प्रत्येकी 2 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

भाजपने 68 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. युतीतील घटक पक्षांना दोन जागा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जनता दल-युनायटेड (जेडीयू) ने बुरारी येथून आपला उमेदवार उभा केला आहे आणि लोक जनशक्ती पक्ष- रामविलास (एलजेपी-आर) ने देवली मतदारसंघातून आपला उमेदवार उभा केला आहे.
महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) 30 जागा लढवत आहे. शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जागांवर भाजपला पाठिंबा दिला आहे. याशिवाय बहुजन समाज पक्ष (बीएसपी) 70 जागांवर आणि असदुद्दीन ओवैसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) 12 जागांवर निवडणूक लढवत आहे. ह्या निवडणुकीचे निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होतील.

दिल्लीत 18 टक्के स्विंग मतदार किंगमेकर
गेल्या दोन लोकसभा (2014 आणि 2019) आणि दोन विधानसभा निवडणुका (2015 आणि 2020) च्या आकडेवारीनुसार, दिल्लीत सुमारे 18 टक्के स्विंग मतदार सत्ता ठरवत आहेत. स्विंग व्होटर किंवा फ्लोटिंग व्होटर म्हणजे असा मतदार जो कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. तो प्रत्येक निवडणुकीत त्याच्या फायद्यांवर आणि तोट्यांवर आधारित वेगवेगळ्या पक्षांना मतदान करतो.