ओशेल-शिवोली येथे राहत्या सदनिकेत सुंकारा कृष्णा प्रसाद चौधरी ऊर्फ के. पी. चौधरी (44) या तेलगू चित्रपट निर्मात्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार काल उघडकीस आला. दरम्यान, चौधरी याने टॉलिवूडमध्ये रजनीकांत अभिनित ‘कबाली’ या चित्रपटाची निर्मिती केली होती.
मागील सहा महिन्यांपासून के. पी. चौधरी हा ओशेल-शिवोली येथील सदनिकेत एकटाच राहत होता. त्याच्या एका मित्राने सोमवारी सकाळी त्याला फोन कॉल केला; पण त्याने प्रतिसाद न दिल्याने त्या मित्राने फ्लॅटमालकाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर फ्लॅटमालकाने सदनिकेत प्रवेश करून पाहणी केली, त्यावेळी के. पी. चौधरी हा आतील खोलीत गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदेश चोडणकर व निरीक्षक सूरज गावस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठवून दिला.
के. पी. चौधरीला 13 जून 2023 मध्ये तेलंगणातील सायबराबाद पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाने ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात जामिनावर सुटका झाल्यावर त्याने गोव्यात शिवोली येथे आसरा
घेतला होता.