>> मुंबई उच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला नोटीस
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 वाजेनंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावत, सायंकाळी 6 वाजेनंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या नोटीसीला 2 आठवड्यांत उत्तर द्यावे, असेही मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संध्याकाळी सहा वाजल्यानंतर 76 लाख मतदान झाल्याचे दिसत आहे. जर एवढे मतदान झाले असेल, तर संध्याकाळनंतर प्रत्येक बुथवर किती मतदारांना टोकन वाटले याची आकडेवारी आणि व्हिडिओ क्लीप द्या, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांच्यासह विरोधी पक्षांनी केली आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर काल सुनावणी झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्याला नोटीस बजावली.