अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सोमवारी 55 पैशांनी गडगडून 87.17 या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको, चीन या देशांतून आयात होणाऱ्या बहुतांश वस्तूंवर अतिरिक्त कर लादल्याने व्यापार युद्धाचा भडका उडण्याच्या धास्तीने रुपयाचे मूल्य तळाला पोहोचले. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकी डॉलर आणखी भक्कम झाला असून, जागतिक भांडवली बाजारात पडझडीचे पडसाद उमटले. परकीय चलन बाजारात सोमवारी रुपयाची सुरूवात घसरणीने झाली. तो दिवसभरात 87.29 या नीचांकी पातळीवर घसरला. अखेर बाजार बंद होताना रुपया हा गेल्या सत्राच्या तुलनेत 87.17 रुपयांवर स्थिरावला.