>> गोमेकॉतील सहावे अवयवदान; तरुण मूळ मध्यप्रदेशचा; गोवा, दिल्ली, मुंबई, अहमदाबादेतील गरजू रुग्णांना अवयवांचे दान
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात इस्पितळात उपचारादरम्यान मूळ जबलपूर-मध्यप्रदेश येथील 25 वर्षीय बांधकाम कामगाराला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. सदर कामगाराच्या पत्नीने त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे 5 रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यानंतर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात ब्रेन डेड तरुणाच्या अवयवांचे दान काल गरजू रुग्णांना करण्यात आले. गोमेकॉतील हे सहावे अवयवदान ठरले. दरम्यान, सदर मृत तरुणाच्या तीन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या एका ट्रस्टमार्फत स्वीकारली जाईल, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल सांगितले.
जबलपूर मध्यप्रदेशातील 25 वर्षीय तरुण डिचोली येथे एका बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करीत होता. त्याला म्हापसा येथे अपघात झाला होता आणि त्यावेळी त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते; मात्र तो वाचू शकला नाही आणि त्याला मेंदू मृत घोषित करण्यात आले. अवयवदानासाठी आवश्यक विनंती केल्यानंतर सदर मृत तरुणाच्या पत्नीने धाडसी निर्णय घेत अवयवदानासाठी संमती दिली. त्याचे ब्रेन स्टेम डेथ सर्टिफिकेशन जीएमसीच्या न्यूरोलॉजी विभागाच्या प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. तेरेसा फरेरा आणि जीएमसीतील औषध विभागाच्या साहाय्यक प्राध्यापक औषध विभाग डॉ. रुक्मा कोलवाळकर यांनी केले.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन प्रा. डॉ. शिवानंद एम. बांदेकर यांनी अवयवदात्याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी जबलपूर-मध्य प्रदेश येथे पोहोचण्याचे वचन दिले आहे.
ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून अवयव प्रत्यारोपणाच्या यशस्वितेसाठी दान केलेले अवयव गरजू रुग्णाच्या रुग्णालयात त्वरित पोहोचविण्यात आले. सोट्टो गोवा, ईएमआरआय 108, गोवा पोलीस वाहतूक विभाग आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकारी यांच्यातील समन्वयाने गोवा मेडिकल कॉलेज ते दोन्ही विमानतळांपर्यंत तीन ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले. त्यामुळे अवयवांची सुरळीत आणि वेळेवर वाहतूक करण्यात आली.
अवयवांचे कोणाला अन् कुठे दान?
गोमेकॉत दोघांना मूत्रपिंड दान : स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनद्वारे मृत अवयवदात्याच्या मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या गोमेकॉतील 35 वर्षीय आणि 36 वर्षीय महिला रुग्णांना मूत्रपिंडाचे दान करण्यात आले.
मुंबईतील रुग्णाला हृदय : मुंबई येथील एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमधील 55 वर्षाच्या पुरुष रुग्णाला हृदय दान करण्यात आले.
अहमदाबादेतील रुग्णाला यकृत : अहमदाबादमधील झायडस हॉस्पिटलमधील 39 वर्षांच्या पुरुष रुग्णाला यकृत दान करण्यात आले.
दिल्लीतील रुग्णाला फुफ्फुस : नवी दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलमधील एका रुग्णाला फुफ्फुस देण्यात आले.
विश्वजीत राणे उचलणार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
सदर 25 वर्षीय ब्रेन डेड घोषित केलेल्या तरुणाला तीन मुले आहेत. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे मुलांवरील पित्याचे छत्र हरपले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्या तरुणाच्या तीन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या ट्रस्टमार्फत स्वीकारली जाईल, असे आश्वासन दिले आहे.