हा तर आचरटपणा!

0
7

कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाशी छेडछाड करून, काहीतरी आचरटपणा करून गल्ला भरणे ही आजकाल जणू परंपराच बनली आहे. शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या छत्रपती संभाजीराजांवरील प्रसिद्ध कादंबरीवर आधारित भव्य दिव्य चित्रपट हिंदी भाषेत येत असल्याच्या आणि त्यात विकी कौशल संभाजीराजांची भूमिका साकारत असल्याच्या वार्तेने हर्षभरीत झालेल्या मराठी माणसाला, चित्रपटाच्या ‘प्रोमो’मध्ये संभाजीराजे येसूबाईंसमवेत नृत्य करतानाचे दृश्य पाहून हसावे की रडावे ते कळेनासे झाले आहे. संभाजीराजांना नृत्य करताना आणि तेही येसूबाईंसह नृत्य करताना दाखवण्याची दिग्दर्शकाला एवढी हौस की, त्यासाठी शिवराज्याभिषेकाचे निमित्त शोधले गेले आणि त्या आनंदाप्रीत्यर्थ संभाजीराजे येसूबाईंसह लेझीम नाचताना दाखवले गेले! ‘बाजीराव मस्तानी’मध्ये अटकेपार झेंडा फडकावणाऱ्या बाजीरावाला संजय लीला भन्साळीने ‘मल्हारी’ गाण्यात नाचवले गेले होते आणि त्यावर वरताण म्हणून जन्मतः थोड्या अधू असलेल्या काशीबाईंना थेट मस्तानीसोबत ‘पिंगा’ घालायला लावले होते. ऐतिहासिक तथ्यांची विल्हेवाट लावण्याच्या ह्या घटना अलीकडे चित्रपटांमध्ये नेहमीच्या बनल्या आहेत. ‘तानाजी’ मध्ये उदेभानाला शेलारमामाऐवजी तानाजीच्या हातून ठार मारले गेले होते आणि उदेभान झालेला सैफ अली खान चक्क मगर खाताना दाखवला गेला होता. ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ मध्ये तर हनुमानाच्या तोंडचे संवाद पाहून प्रेक्षक थक्क झाले होते. असे वारंवार होते आहे. अशा प्रकारच्या वादामुळे चित्रपटांची सर्वदूर प्रसिद्धी होती म्हणून असला आचरटपणा जाणूनबुजून केला जातो का असा प्रश्नही त्यामुळे उपस्थित होतो. सध्या ज्या चित्रपटाचा वाद चालला आहे, त्या ‘छावा’ मध्ये छत्रपती संभाजीराजांसारख्या वंदनीय महापुरूषासंबंधी हा चित्रपट आपण काढतो आहोत आणि त्याबाबत महाराष्ट्रातील आणि बाहेरील कोट्यवधी शिवप्रेमी जनतेच्या भावना अत्यंत तीव्र आहेत ह्याची लक्ष्मण उतेकर ह्या मराठमोळ्या दिग्दर्शकाला कल्पना नसेल असे कसे म्हणावे? हा चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचा आहे. येत्या 14 फेब्रुवारीला तो येणार आहे. चित्रपटाच्या प्रोमोमध्ये नेमके संभाजीराजे आणि येसूबाई नृत्य करीत असल्याचे वादग्रस्त दृश्य दाखवले गेले आहे. म्हणजे हा प्रोमो येताच शिवप्रेमी संघटना रस्त्यावर उतरतील, वादाचे मोहोळ उठेल हे एका मराठी दिग्दर्शकाला माहीत असू नये? हा वाद उफाळताच कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती मैदानात उतरले. तिकडे सातारचे उदयनराजे संतापले, मंत्री उदय सामंतांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वांनी हा चित्रपट वादग्रस्त दृश्ये काढल्याविना प्रदर्शित होऊ न देण्याचा खरमरीत इशारा दिला, तेव्हा आता हे वादग्रस्त दृश्य काढण्यास संमती दिली गेली आहे. दिग्दर्शकांनी राज ठाकरेंची भेटही घेतली. म्हणजे ह्या वादाच्या निमित्ताने का होईना मराठी माणसाच्या घरोघरी ह्या चित्रपटाचा विषय गेला आहे आणि त्याचा फायदा गल्ल्यावर होईल असा निर्माते दिग्दर्शकांचा विचार असावा. इतिहासाच्या तज्ज्ञांना प्रदर्शनापूर्वी चित्रपट दाखवण्याची तयारीही आता दाखवली जाते आहे. वास्तविक, अशा प्रकारचा चित्रपट काढण्यापूर्वीच मान्यवर इतिहासकारांशी सल्लामसलत करणे अधिक योग्य ठरले नसते काय? मराठेशाहीत आणि तेही शिवछत्रपतींच्या दरबारात राजपुत्र संभाजी आणि राजस्नुषा येसूबाई राणीसाहेब ह्या खाशा स्वारी अशा आम जनतेसमवेत बेफाम नृत्य करत असतील हे संभवते तरी काय? हा निव्वळ आचरटपणाच आहे. शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र प्रसिद्ध आहे. त्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे. “राजे लोकांस मुख्य कार्यसाधनीयत कारभार आहे. त्यात विक्षेप पडो न यावा. कलावंत, गवई, निजग्रही यांचे नित्य नृत्यगायन व महोत्साहविरहित दरबारी करूच नये. महोत्सहामध्ये आपण बसले जागी नृत्यगायनादि न करविता बाहेरल्याबाहेर मजलसीस करवावे. काय म्हणोन की यांस चित्त आसक्त झाले नाही तेच बरे. काही एक आसक्ती जाहल्याने व्यसने प्राप्त होऊन राज्यकर्ते अंतरतात.” केवढा महत्त्वाचा विचार महाराजांनी आज्ञापत्रातून सांगितलेला आहे. मोंगल बादशहांचे दरबारी विलास ठाऊक असल्याने शिवछत्रपतींनी हा दंडक घालून दिलेला होता. अशा राजाचा पुत्र आपल्या पित्यासमोर राजस्नुषेला घेऊन लेझीम का होईना नृत्य करील काय? शिवाय लेझीम हा व्यायामाचा खेळ गणला गेला आहे. ते नृत्य करण्याचे वाद्यही नव्हे आणि शिवकालात मुळात लेझीम अस्तित्वात होती की नाही ह्याबाबत शंका इतिहासकार व्यक्त करीत आहेत. ‘छावा’ च्या प्रोमोने हा इतिहासाचा एवढा विपर्यास केला आहे. प्रत्यक्ष चित्रपटामध्ये आणखी काय काय दिवे लावले गेले असतील देवच जाणे!