>> शॅक कामगारांकडून मारहाण प्रकरण; 15 जण चौकशीसाठी ताब्यात
हरमल येथील समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारण्यास गेलेल्या अमर दत्ताराम बांदेकर (37) या तरुणाचा शॅक कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत रविवारी मृत्यू झाला होता. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी काल एका संशयितास अटक केली. सुरेंदर कुमार (39, रा. कुल्लू, हिमाचल प्रदेश) असे त्याचे नाव आहे. त्याला पेडणे न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात मांद्रे पोलिसांनी 15 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सविस्तर माहितीनुसार, अमर बांदेकर हा काल सायंकाळी 6.30 च्या सुमारास हरमल किनाऱ्यावर फेरफटका मारत होता, त्यावेळी तेथीलच एका शॅकसमोर मांडून ठेवलेल्या खुर्च्या आणि टेबलचा कोणालाही अडथळा होऊ नये, यासाठी त्याने काही खुर्च्या व टेबल बाजूला केले. त्यामुळे शॅकच्या एका कर्मचाऱ्याने त्याला हटकले. त्यावरून सुरुवातीला शाब्दिक वाद होऊन नंतर त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले. अन्य 10-12 शॅक कर्मचाऱ्यांनी मिळून अमरला बेदम मारहाण केली. त्यानंतर स्थानिक आणि मित्रांनी जखमी अमरला तुये इस्पितळात दाखल नेले; मात्र इस्पितळात दाखल करण्यापूर्वीच वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता.
मारहाणीनंतर अमर याच्या नाकातून रक्तस्त्राव, डोळा व डोक्याच्या मागील बाजूस मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असे मित्रांनी सांगितले. दरम्यान, आमदार जीत आरोलकर यांनी अमर दत्ताराम बांदेकर याच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली व त्यांच्या आई श्रीमती उषा व कुटुंबीयांना धीर दिला. दरम्यान, या प्रकरणात सामील सर्वांवर गुन्हा दाखल करावा, तसेच शॅकचा परवाना रद्दची मागणी स्थानिकांनी केली.