युरी आलेमाव; किनाऱ्यांवरील मारहाणीच्या घटना गंभीर
राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून, यंदाच्या पर्यटन हंगामात किनाऱ्यावरील शॅकव्यावसायिक व कर्मचाऱ्यांकडून काही दिवसांपूर्वी एका पर्यटकाचा आणि रविवारी एका स्थानिक तरुणाचा खून होण्याच्या ज्या घटना घडल्या, त्या अत्यंत गंभीर असून, त्याचा फटका राज्याच्या पर्यटनालाही बसणार आहे, अशी भीती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना व्यक्त केली. कायदा व सुव्यवस्था राखण्यात गृहखात्याला पूर्णपणे अपयश आले असल्याचा आरोपही आलेमाव यांनी केला.
राज्यातील शॅकव्यावसायिक व कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटना गंभीर आहेत, त्यात दोघांचा बळी गेला आहे. कळंगुट येथे शॅकव्यावसायिकांच्या मारहाणीत एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर रविवारी हरमल येथे एका स्थानिक तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला. भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी सरकारकडून प्रयत्न व्हायला हवेत, असे आलेमाव म्हणाले.
गेल्या आठवड्यात दक्षिण गोव्यात एका दिव्यांग युवतीवर पाचजणांनी सामूहिक बलात्कार केल्याची जी घटना घडली, ती अत्यंत दुःखद व धक्कादायक अशी घटना आहे. गुन्हेगारांना अशा प्रकारे गुन्हे करण्याचे धाडस होणार नाही, यासाठी पोलिसांनी सतर्क राहिले पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी आलेमाव यांनी केली.
आम आदमी पक्षाकडूनही चिंता व्यक्त
हरमल येथे शॅक कर्मचाऱ्यांकडून एका स्थानिकाचा झालेला खून, तसेच दक्षिण गोव्यात एका दिव्यांग युवतीवर झालेला सामूहिक बलात्कार ही चिंतेची बाब असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे हे या घटनांवरून स्पष्ट होत असल्याचे आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी म्हटले आहे.
राज्यातील शॅकव्यावसायिकांनी आपले शॅक्स परप्रांतीयांना चालवण्यास दिलेले असून, हरमल येथील जास्तीत जास्त शॅक हे हिमाचलप्रदेशमधील व्यावसायिक चालवित असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याचे पालेकर यांनी म्हटले आहे. शॅकव्यावसायिकांच्या दादागिरीमुळे राज्यातील पर्यटन व्यवसायावर विपरित परिणाम होण्याची भीतीही पालेकर यांनी व्यक्त केली.