दहावीची परीक्षा 1 मार्चपासून

0
4

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले असून, दहावीची परीक्षा 1 मार्च ते 21 मार्च या दरम्यान एकूण 32 केंद्रातून घेण्यात येणार आहे. विद्यालयातील प्रात्यक्षिक परीक्षा 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.
दहावीची परीक्षा डिचोली, काणकोण, कुंकळ्ळी, कुडचडे, केपे, माशेल, मडगाव, मंगेशी, शिवोली, पणजी, हरमल, पेडणे, पिलार, फोंडा, सांगे, साखळी, शिरोडा, शिवोली, तिस्क-धारबांदोडा, वाळपई, वास्को, नावेली, पर्वरी, मांद्रे, कळंगुट, वेर्णा, हळदोणा, कुजिरा, पैंगीण, म्हापसा (ए), म्हापसा (बी), नेत्रावळी, कोलवाळ अशा 32 केंद्रातून घेण्यात येणार आहे. उर्दू माध्यमासाठी मडगाव, पणजी, वाळपई व वास्को या 4 केंद्रांत परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सकाळी 9.30 ते 12.30 पर्यंत या वेळेत घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे. एखादी वेगळी सुटी जाहीर झाली, तरीही पेपर पुढे ढकलला जाणार नाही, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

अपार आयडी नोंदणी पूर्ण करा
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांच्या प्रमुखांना नववी आणि अकरावीच्या मुलांची अपार आयडी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली आहे.
विद्यालय आणि उच्च माध्यमिक परीक्षेसाठी अपार आयडी विद्यार्थ्याचे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. संस्था प्रमुखांनी 20 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांची अपार आयडी मंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.