>> नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातर्फे कला अकादमीत चार दिवसीय ‘भारंग’ नाट्य महोत्सवाचे आयोजन
‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चा चार दिवसीय ‘भारंग’ (भारत रंग महोत्सव) हा आंतरराष्ट्रीय भारतीय नाट्य महोत्सव बुधवार दि. 29 जानेवारीपासून पणजीत सुरू होत असून, कला अकादमीत होणारा हा नाट्य महोत्सव 1 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ‘भारंग’ हा जगातील सर्वांत मोठा नाट्य महोत्सव आहे. ‘एक रंग श्रेष्ठ रंग’ हा यंदाच्या महोत्सवाचा विषय आहे.
दि. 29 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता कला अकादमीत या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने गोवा कला अकादमीच्या सौजन्याने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर गिरीश कर्नाड यांनी लिहिलेल्या ‘नागमंडळ’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे.
गोव्यात ‘नागमंडळ’ या नाटकाव्यतिरिक्त 30 जानेवारी लेखक विजयकुमार नाईक यांचे ‘पालशेतची विहिर’, 31 जानेवारी रोजी विजयरान देथा यांचे ‘माँ री मैं का से कहूँ’ आणि 1 फेब्रुवारी रोजी मैथिलेश्वर यांनी लिहिलेले ‘बाबुजी’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
भारंग नाट्य महोत्सवाचे देशात 11 ठिकाणी नाट्यप्रयोग होणार आहेत. त्यात दिल्ली, गोवा, आगरतळा, अहमदाबाद, भटिंडा, बंगळुरू, भोपाळ, गोरखपूर, जयपूर, खैरगड व रांची या ठिकाणांचा समावेश आहे. या महोत्सवात रशिया, इटली, जर्मनी, नॉर्वे, झेक रिपब्लिक, नेपाळ, तैवान, स्पेन व श्रीलंका येथील नाटक निर्मिती कंपन्या सहभागी होणार आहेत.
अभिनेता राजपाल यादव ‘भारंग’चा रंगदूत
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी व सुप्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव हे यंदाच्या महोत्सवाचे रंगदूत आहेत. यंदाचा महोत्सव हा 28 जानेवारी ते 16 फेब्रुवारी असा 20 दिवसांचा असून, तो भारतात 11 ठिकाणी होणार आहे. आणि या दरम्यान जगभरातील 200 नाटकांचे प्रयोग होणार आहेत. हा महोत्सव भारतात 11 ठिकाणी तसेच भारताव्यतिरिक्त काठमांडू व कोलंबो येथेही होणार आहे.