सायबर सुरक्षा जनजागृतीत सर्वांचा सहभाग हवा

0
2

>> पोलीस महासंचालकांचे आवाहन; देशात वर्षाला 10 लाख तक्रारी नोंद

देशात आणि राज्यातही सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून संपूर्ण देशात वर्षाला सुमारे 25 हजार कोटी रुपयांची फसवणूक होत असून, 10 लाखाच्या आसपास तक्रारी नोंद होतात. सायबर गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. गोवा पोलीस प्रशासनाकडून सायबर सुरक्षेबाबत प्रयत्न केला जात असून, प्रसारमाध्यमे आणि स्वयंसेवी संस्थांनी सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी पत्रकारांसाठी सायबर सुरक्षेबाबत पोलीस मुख्यालयात आयोजित एका कार्यशाळेत बोलताना येथे काल केले.

सायबर गुन्हेगार काही वेळा बनावट संकेतस्थळ तयार करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करतात. ही संकेतस्थळे अधिकृत संकेतस्थळाची हुबेहूब नक्कल असते. मात्र या संकेतस्थळाच्या युआरएलमध्ये स्पेलिंग चुकीचे असते. गोवा पोलिसांनी गेल्या काही महिन्यांत अशी 85 बनावट संकेतस्थळे बंद केली आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

सायबर गुन्हेगार लोकांना विविध प्रकारची आमिषे दाखवितात, भीतीचा धाक, गुंतवणुकीसाठी बनावट पोर्टल सुरू करतात, डिजिटल अटक, सेक्सटॉर्शन, सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल, नोकरी देण्याचे आमिष, बनावट कर्ज अशा अनेक पद्धतींनी लोकांची फसवणूक करतात. नागरिकांनी जागरुक राहण्याची गरजअसून, आपली वैयक्तिक माहिती कुणाला देऊ नये, मोबाईलवर आलेल्या संदेशाची अधिकृतता तपासली पाहिजे, असा सल्ला सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी दिला.
यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक अजय शर्मा, उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांची उपस्थिती होती.