>> केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
>> मुरगाव रवींद्र भवन ते एमपीटी पुलाचे उद्घाटन
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एकेकाळी मुरगाव बंदरातील अवजड वाहतूक वास्को शहरांच्या बाहेरून काढण्याचे विचार माझ्याजवळ मांडले होते. ते आज प्रत्यक्षात पूर्ण होत आहेत. या केबल उड्डाण पुलामुळे मुरगाव व वास्को भागातील प्रदूषण नियंत्रणात येणार आहे. देशाबरोबर गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग अपघातमुक्त होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
644 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला मुरगाव बंदराला जोडणारा उड्डाण केबल पूल हा देशातील पहिला केबल पूल आहे. याचे पूर्ण श्रेय मोदी सरकारला जाते. राष्ट्रीय महामार्ग प्रत्येक गावात जोडण्यासाठी आमचे प्रयत्न असून, यासाठी घरे व वनक्षेत्र वगळणे राज्य सरकारचे पहिले कर्तव्य आहे. तसेच देशाबरोबर गोव्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या आजूबाजूला झाडे लावण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राज्य सरकारला केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल मंगळवारी देशातील पहिल्या केबल-स्टेड ब्रिजचे अधिकृतपणे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार संकल्प आमोणकर, कृष्णा साळकर, उल्हास तुयेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बोलताना, गोव्याचा खऱ्या अर्थाने विकास मनोहर पर्रीकर यांच्या आशीर्वादाने 2014 सालापासून सुरु झाला व आजपर्यंत सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने अनेक प्रकल्प पूर्ण होऊन गोव्यात विकास झाला आहे. मुरगाव बंदर कनेक्टीवीटी हा प्रकल्प पूर्ण व्हायला सहा वर्षे लागली. आता वास्को शहरातील वाहतुकीचा बोजा कमी होणार आहे. मागच्या 50 वर्षात जो विकास झाला नाही तो आता डबल इंजिन सरकारमुळे झाला आहे. आता मेट्रो ट्रेन चालू करण्याची संकल्पना असून मुरगावचे कोळसा प्रदूषण कमी करण्यासाठी प्रय़त्न सुरू असल्याचे सांगितले.
विद्युत रोषणाई
केबल-स्टेड ब्रिजवर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. ढोल ताशांच्या गजरात सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. रवींद्र भवनच्या शेजारील उड्डाण पुलावर खास रंगमंच उभारण्यात आला होता. तर दुसऱ्या बाजूला शेकडो वाहने पार्क केली होती. यावेळी पोलीस व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती.