सांकवाळमधील अपघातात 2 कारचालक ठार

0
4

सांकवाळ येथे काल पहाटे 5 वाजता दोन कारमध्ये झालेल्या अपघातात स्विफ्ट कारचा चालक जागीच ठार झाला. सुरेश जग्गल (45, शांतीनगर-वास्को) असे मृत चालकाचे नाव आहे. या अपघातात जखमी झालेला एर्टिगा कारचा चालक यल्लापा मुनिस्वामी (30, रा. कळंगुट) याचे उपचारादरम्यान निधन झाले. भरधाव निघालेली स्विफ्ट कार चुकीच्या लेनमध्ये वळली व त्यानंतर त्याने एर्टिगा कारला धडक दिल्याने हा अपघात झाला.

वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिलेल्या माहितीनुसार तेरेपाल सांकवाळ येथे सुरेश जग्गल हे स्विफ्ट कार घेऊन (क्र. जीए-07-सी-7406) कुठ्ठाळीहून वास्कोच्या दिशेने जात असताना चुकीच्या लेनमध्ये घुसले आणि पुढे जात असलेल्या जीए-03-एन-4056 क्रमांकाच्या एर्टिगा कारला धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारचा चालक सुरेश जग्गल याचा जागीच मृत्यू झाला, तर एर्टिगा कारचा चालक यल्लापा मुनिस्वामी हा गंभीर जखमी झाला. याशिवाय स्विफ्ट कारमधील प्रवासी निसार अहमद (54, रा. बंगळुरू) यालाही गंभीर दुखापत झाली. जखमी दोघांनाही लगेचच नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या यल्लापा मुनिस्वामी याचे निधन झाल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद वेर्णा पोलिसांत करण्यात आली असून, त्यांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास वेर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजदत्त आरसेकर करीत आहेत.