महिला डॉक्टरवरील बलात्कार, खूनप्रकरणी संजय रॉयला जन्मठेप

0
4

कोलकात्यात 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरवलेल्या संजय रॉयला काल सियालदह न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याला या प्रकरणात शनिवारी दोषी ठरवण्यात आले होते. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या प्रकरणाचा निकाल सुनावणी सुरू झाल्यापासून 59 दिवसांनी लागला.

मागच्या वर्षी 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी उत्तर कोलकाता येथील आर. जी. कर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा अनेक जखमांच्या खुणा असलेला मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात आधी पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले होते. यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे 10 ऑगस्ट रोजी संजय रॉय नावाच्या व्यक्तीला अटक केली होती.
पश्चिम बंगालमधील लोकांचा आक्रोश पाहता हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात आले. त्यानंतर या प्रकरणी न्यायाधीश अनिर्बान दास यांनी काल निकाल दिला. त्यानुसार संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचसोबत त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.