2027 मध्ये 27 जागांवर विजयाचे ध्येय : दामू नाईक

0
5

>> भाजप संघटन आणखी मजबूत करणार; राज्यात पक्ष संघटना बळकट करताना घटक पक्षांना विश्वासात घेणार; जबाबदारी निष्ठेने पार पाडणार

राज्यात भाजप संघटन आणखी मजबूत करण्यासाठी मिशन गोवा हेच मुख्य ध्येय आहे. 2027 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत 27 जागा निवडून आणण्याचे ध्येय असून, सर्व 40 मतदारसंघात पक्ष संघटन बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. भाजपचे पक्ष संघटन बळकट करताना घटक पक्षांना विश्वासात घेतले जाणार आहे, असे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष दामोदर ऊर्फ दामू नाईक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काल स्पष्ट केले.
भाजपकडे नवीन नेते, कार्यकर्ते आकर्षित होत आहेत. त्यामुळे पक्षातील वातावरण सलोख्याचे ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. पक्ष संघटनेमध्ये शिस्तीला प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्हा पंचायत, नगरपालिका निवडणुकांबाबत पक्षातील सर्वांना विश्वास घेऊन रणनीती तयार केली जाणार आहे, असेही दामू नाईक यांनी सांगितले.

भाजपसारख्या देशातील मोठ्या राजकीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होऊ, याचा आपण कधी विचार केला नव्हता. केंद्रीय पातळीवरील नेतृत्वाने आपल्या प्रामाणिक, निष्ठापूर्वक केलेल्या कार्याची दखल घेतली. त्यामुळे आपणासारखा एक सामान्य कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष होऊ शकला, असेही दामू नाईक म्हणाले.
भाजपचा साधा कार्यकर्ता म्हणून 1994 सालापासून कार्याला सुरुवात केली. भाजपचा गटाध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष, प्रदेश प्रवक्ता, प्रदेश सरचिटणीस सारख्या विविध पदावर काम करण्याची संधी दिली. आता, प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्य करण्याची संधी दिली आहे. आपणाला आत्तापर्यंत भाजपने मोठे केला असून, राज्यात भाजप बळकट हेच मुख्य ध्येय आहे, असेही त्यांनी सांगितले.

भाजपच्या वाटचालीत आत्तापर्यंत अनेकांनी आपले योगदान दिले आहे. आगामी 2027 ची विधानसभा निवडणूक हे एक आव्हान आहे. सामान्य कार्यकर्त्यांच्या सहकार्याने 27 आमदार निवडून आणण्याचे ध्येय ठेवून कार्याला सुरुवात केली आहे, असेही दामू नाईक यांनी सांगितले.
सासष्टी तालुक्यात भाजपचे संघटन बळकट करण्यासाठी मिशन सासष्टी राबविले जाणार नाही. आपले केवळ एक फातोर्डा मतदारसंघ हे ध्येय नसून, आज संपूर्ण गोवा हेच आपले ध्येय बनले आहे. फातोर्डा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत अजूनपर्यंत विचार केलेला नाही. पक्ष नेतृत्वाने आत्तापर्यंत ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या. त्या निष्ठापूर्वक निभावण्याचे काम केले आहे. आता, प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. ही जबाबदारी निष्ठापूर्वक पूर्ण करणार आहे. भाजपमध्ये विविध पदावर काम करताना ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. आता, प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना वेळो वेळी ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेणार आहे, असेही ते म्हणाले.

मंत्रिमंडळात फेरबदल झाला पाहिजे

राज्य मंत्रिमंडळात फेरबदल निश्चित झाला पाहिजे. त्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून योग्य निर्णय घेतला जाणार आहे. मंत्रिमंडळात फेरबदल करताना विविध मुद्दे विचारात घेतले जाणार आहेत, असेही दामू नाईक यांनी सांगितले.

जुन्या-नव्यांची सांगड घालणार

काही कारणास्तव भाजप पक्ष सोडून गेलेल्या आमच्या जुन्या नेत्यांना परत पक्षात आणणे महत्त्वाचे आहे. तसेच, पक्षातील जुन्या आणि नवीन नेत्यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. भाजपपासून फारकत घेऊन राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांनी पक्षात येण्याची गरज आहे, असेही दामू नाईक म्हणाले.