- प्रा. रमेश सप्रे
वृत्तपत्रे नि समाजमाध्यमे यांवर सध्या सचित्र चर्चा सुरू आहे ती या महाकुंभाच्या आकडेवारीची. इतक्या कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र अमृतस्नान केले किंवा या संपूर्ण कालावधीत 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 म्हणजे पंचेचाळीस दिवसांत सुमारे पन्नास कोटी भक्त स्नान करून कृतकृत्य होतील. त्याचबरोबर इतके हजार कोटी रुपये शासनाने खर्च केले, तर इतके लाख कोटी रुपयांचे उत्पन्न सरकारला मिळेल. म्हणजे पुन्हा सारा विषय आकड्यांच्या जंजाळातच फिरत राहतोय. याहीपेक्षा महत्त्वाचे पैलू या महाकुंभाला आहेत- ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक.
आपला अनुभव आहे की जी गोष्ट ‘महा’ (ग्रँड) असते ती महान (ग्रेट) असतेच असे नाही. उदा. दूरचित्रवाणीवरील महामालिका किंवा घरांच्या वसाहतींचे महाप्रकल्प. या गोष्टी आकाराने, संख्येने ‘महा’ असल्या तरी गुणवत्तेने महान असतीलच असे नाही. पण संख्यात्मक ‘महा’ असलेल्या काही गोष्टी मात्र गुणांच्या (मूल्यांच्या) दृष्टीनेही ‘महान’ असतात. उदा. महाभारत- हा एक लक्ष श्लोकसंख्या असलेला सर्वार्थाने ‘महा’ असा ग्रंथ त्यातील संस्कार नि संदेश यामुळे सर्वकाळासाठी ‘महान’ ग्रंथ बनला आहे. हीच गोष्ट आहे सध्या चालू असलेल्या मानवाच्या इतिहासातील सर्वात ‘महान महाकुंभा’ची.
वृत्तपत्रे नि समाजमाध्यमे यांवर सध्या सचित्र चर्चा सुरू आहे ती या महाकुंभाच्या आकडेवारीची. इतक्या कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र अमृतस्नान केले किंवा या संपूर्ण कालावधीत 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 म्हणजे पंचेचाळीस दिवसांत सुमारे पन्नास कोटी भक्त स्नान करून कृतकृत्य होतील. त्याचबरोबर इतके हजार कोटी रुपये शासनाने खर्च केले, तर इतके लाख कोटी रुपयांचे उत्पन्न सरकारला मिळेल. म्हणजे पुन्हा सारा विषय आकड्यांच्या जंजाळातच फिरत राहतोय. याहीपेक्षा महत्त्वाचे पैलू या महाकुंभाला आहेत- ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक.
यासंदर्भात एक अंतर्मुख करणारा मार्मिक प्रसंग घडला. इंग्रजांचे सरकार असताना एक इंग्रज अधिकारी पं. मदनमोहन मालवीय यांच्याकडे जाऊन म्हणाला, ‘कोणतीही सरकारी अधिसूचना नसताना; रेडिओ, वृत्तपत्रे यांसारख्या प्रसारमाध्यमांतून माहिती दिली नसताना; जाहीरसभा, इतर संपर्क-साधने यांचाही वापर केला नसताना अचूक बारा वर्षांनी, विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी इतक्या प्रचंड संख्येने कुंभमेळ्यासाठी लोक जमतात याचे रहस्य काय आहे?’ हे ऐकून पं. मदनमोहन मालवीयांनी आत जाऊन एक पंचांग आणले आणि त्यात अतिशय बारीक अक्षरांत लिहिलेली एक ओळ दाखवली जिच्यात कुंभमेळ्याचा दिवस, मुहूर्त इ. गोष्टी सांगितल्या होत्या. त्यावेळची समाजातील अल्पसाक्षरता लक्षात घेता अशी माहिती लक्षलक्ष जनसामान्यांपर्यंत पोचवली जात होती नि तीसुद्धा हजारो वर्षांपासून, हा मोठा चमत्कारच नव्हे का?
- हे सारे ऐकून नि पाहून तो अधिकारी चकित झाला. त्याच्या स्वरात नि हावभावात भारतीय संस्कृतीला एकप्रकारे मानवंदनाच होती.
याच्याविरुद्ध प्रतिक्रिया एका सर्वोच्चपदी असलेल्या नेत्याची होती. त्यांच्याच शब्दात ‘कुंभमेळा’ हा जनतेच्या शक्तीचा नि वेळेचा महाअपव्यय आहे. यामुळे देशाची खूप शक्ती नि वेळ वाया जातो. कालांतराने त्यांना आपली जनमानसाच्या आकलनातील चूक लक्षात आली आणि त्यांनी मान्य केले- ‘मला भारतीय संस्कृतीची बौद्धिक ओळख झाली पण तिच्या अंतरंगाचे भावनिक रसग्रहण काही करता आले नाही.’ असो.
खरोखर, कुंभमेळ्यासारखे पवित्र दिवस (पर्व) कोटीकोटी जनतेच्या भावनांशी अजून जोडलेले आहेत. तीन प्रकारची कुंभपर्वं असतात. सहा वर्षांनी येणारे ‘अर्धकुंभपर्व’, बारा वर्षांनी येणारे ‘पूर्णकुंभपर्व’ आणि बारा पूर्णकुंभांनंतर म्हणजे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारे ‘महाकुंभपर्व’! एका परदेशी स्त्रीने हिंदी भाषेतील मुलाखतीत आपल्याला आलेला दिव्य अनुभव सांगितला- ‘आधीच्या जन्मात काहीतरी मोठं पुण्य केलं असेन, त्याचंच फळ म्हणून या महाकुंभकाळात त्रिवेणीसंगमात पवित्र स्नान करण्याची संधी लाभली.’ हा अर्थातच काहीजणांना अंधश्रद्धेचा भाग वाटेल; पण ज्यांच्या मनात भावभिजली श्रद्धा आहे त्यांना येणारा अनुभव त्यांनाच कळणार. नाही का?
सध्या अचंबित करणारी महास्नानाची दृश्ये, त्यांच्यावर केली जाणारी पुष्पवर्षा, लक्षावधी लोकांसाठी केली गेलेली अद्ययावत व्यवस्था हे सारे अजबगजब आहे. याची नोंद मोठ्या अक्षरांत ‘गिनेस’ किंवा ‘लिम्का’ यांच्यासारख्या जागतिक उच्चाकांची नोंद करणाऱ्या पुस्तकांत केली जाईल. पण ‘भव्यता’ हेच केवळ महाकुंभाच्या यशाचे माप नाही.
दिव्यता, स्वर्गीयता हेच खरे अशा महापर्वांचे लक्षण असते. यासाठी आपल्याला या महापर्वाच्या पौराणिक-ऐतिहासिक कथांकडे वळावे लागेल.
यावेळच्या महाकुंभपर्वात एकूण सहा दिवस पवित्रस्नानासाठी अधिक शुभ मानले गेलेत.
- पौष पौर्णिमा- 13 जानेवारी 2025
- मकर संक्रांती- 14 जानेवारी 2025
- मौनी अमावस्या- 29 जानेवारी 2025
- वसंतपंचमी- 3 फेब्रुवारी 2025
- माघी पौर्णिमा- 12 फेब्रुवारी 2025
- महाशिवरात्री- 26 फेब्रुवारी 2025
या दिवशींच्या स्नानांना ‘अमृतस्नान’ म्हणतात. असं का? याचे उत्तर पुराणातील एका अतिअद्भुत प्रसंगात आहे. तो प्रसंग आहे- ‘समुद्रमंथन’! देवदानवांनी एकत्र येऊन सागरात पडलेल्या अमृतकुंभाच्या प्राप्तीसाठी समुद्राचे मंथन केले. मेरूपर्वताची मंथा (रवी) करून, वासुकी नागाची दोरी करून सागराच्या दोन्ही तीरांवर उभे राहून तो घुसळायला सुरुवात केली. त्यावेळी हलाहल विष नि मदिरा यांच्याबरोबरच ऐरावत हत्ती, पारिजातकाचे झाड, कौस्तुभमणी, अप्सरा, वरमाला हातात घेऊन प्रकटलेली लक्ष्मी अशी रत्ने वर आली. सर्वात शेवटी ‘अमृतकुंभ’ हातात घेऊन साक्षात देवांचा वैद्य धन्वंतरी प्रगट झाला.
‘अमृतकुंभ’ मिळवण्यासाठी देव नि दानव यांच्यात झटापट सुरू झाली. कधी तो कुंभ दानवांच्या हातात तर कधी देवांच्या हातात पडत होता. या धावपळीत अमृताचे काही थेंब उडाले नि काही ठिकाणी पडले. त्या क्षेत्रात असलेल्या नदीच्या काठी कुंभमेळा भरू लागला. या चार महत्त्वाच्या नगरी- हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक. आलटून-पालटून या चार ठिकाणी कुंभमेळा भरवला जातो.
विशिष्ट काळानंतरच कुंभपर्व कसे येते?
आकाशातील ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे कुंभपर्वांचा काळ ठरतो. गुरू, कुंभ, सूर्य, मेष अशा ग्रह-तारा-राशी यांच्या विशिष्ट युतीमुळे कुंभ, पूर्ण कुंभ, महाकुंभ यांचा मुहूर्त ठरवला जातो. त्याप्रमाणे देशाच्या सर्व दिशांनी नि जगातील जवळजवळ सर्व देशांतील यात्री पवित्र स्नानासाठी येतात. तेही एकाच वेळी नि लाखोंच्या संख्येने. नि हे गेली हजारो वर्षे घडत आलेय. यावरून आपल्या सांस्कृतिक वारशाच्या प्राचीनतेची कल्पना येते. खरोखर, अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे.
यावरून सिद्ध होते की जेव्हा दूरचा वेध घेऊ शकणाऱ्या दुर्बिणी (टेलिस्कोप), अवकाशात तरंगणाऱ्या मानवनिर्मित प्रयोगशाळा, वेगाने गणितं करणारे संगणक, संशोधनासाठी सुसज्ज वेधशाळा यांपैकी काही म्हणजे काहीही नव्हते त्याच्या पूर्वीपासून आपले अंतरिक्ष वैज्ञानिक (आर्यभट्ट, वराहमिहीर, भास्कराचार्य इ.) ग्रहनक्षत्रांचे अचूक वेध घेत होते- तेही आपल्या तर्कबुद्धीने, निरीक्षण-शक्तीने नि अंतःस्फूर्तीने. नमन या मेधावी पूर्वजांना! कुंभपर्व सोडाच, पण वर्षात येणारी अनेक ग्रहणेसुद्धा अचूक वर्तवली जात असत. असो.
‘अमृतकुंभ’ समुद्रमंथनाशी संबंधित असल्यामुळे या पर्वकाळी केल्या जाणाऱ्या स्नानाला ‘अमृतस्नान’ म्हटले गेले. विशेष म्हणजे सागर सर्व ठिकाणी नसल्यामुळे नद्यांच्या प्रवाहात स्नान करणे महत्त्वाचे मानले गेलेय. नाहीतरी जगातील सर्व प्राचीन संस्कृतींना नदीकाठच्या संस्कृती (रिव्हर व्हॅली सिव्हिलायझेशन) असेच म्हटले जाते. कुंभपर्वातील स्नानं हरिद्वार क्षेत्रात गंगा नदीत, प्रयागराजमध्ये गंगा-यमुना-सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमात, नाशिकमध्ये गोदावरी नदीत, तर उज्जैनला क्षिप्रा नदीत. आजही ही परंपरा चालू आहे. नाहीतरी अखंडता नि चिरप्रवाही असणे हेच आपल्या संस्कृतीचे प्राणसूत्र मानले गेलेय. कालपरवाची संस्कृती आपली नव्हेच!
आताआता पाश्चात्त्य इतिहासकारांचा या गोष्टींवर डोळस विश्वास बसू लागलाय. भारतीय विचारवंत मात्र अजून संभ्रमातच आहेत.
कुंभमेळ्यासंदर्भात असे सांगितले जाते की, ऋग्वेदकाळापासून कुंभपर्वाचे उल्लेख सापडतात. महाभारतात नद्यांच्या संगमस्थानांचे मानवी मनाच्या शुद्धीसाठी खूपच माहात्म्य सांगितले गेलेय. त्याचप्रमाणे अशा पर्वकाळात करायची व्रतं-वैकल्ये, कर्मकांडे यांची विस्तृत वर्णने पुराणग्रंथात येतात. त्याचा बहुजनसमाजाच्या मनावर खूप प्रभाव पडतो. यामुळे संस्कृतीचा प्रवाह वाहता राहतो. त्यात वारंवार निर्माण होणाऱ्या विकृती, अशुद्ध प्रवृत्ती यांना सुधारण्याचे कार्य सर्वकाळी अस्तित्वात असलेल्या साधुसंतांच्या परंपरेतून साधले जाते.
याच्या जोडीलाच भारताला भेट दिलेल्या ह्यूएन्त्संग, आल्बेरुनी यांच्यासारख्या विदेशी प्रवाशांनी लिहिलेल्या ग्रंथांतही महाकुंभासारख्या घटनांचा उल्लेख आढळतो.
एरव्ही अनेक पूर्णकुंभ-महाकुंभ आजपर्यंत झाले आहेत; पण यावेळचा सोहळा मात्र केवळ अभूतपूर्व असाच आहे. एका बाजूला सतत स्फोट होत जाणारी संख्या असली तरी दुसऱ्या बाजूंनी सर्व व्यवस्थांचे संचालन करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदतही मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे. यासाठी काही गोष्टी मुद्दाम लक्षात ठेवण्याजोग्या आहेत- भाविकांची चेंगराचेंगरी, अचानक उद्भवणारे आगीसारखे अपघात, याशिवाय मानवतेविरुद्ध केल्या जाणाऱ्या हिंसक अतिरेकी हल्ल्यांची शक्यता असे सारे आणीबाणीचे प्रसंग लक्षात घेऊन जी जय्यत सिद्धता केलेली आहे, त्याचे काही पैलू-
- कुंभमेळा, पवित्र स्नानं, धार्मिक विधी इ. गोष्टींवर लक्ष नि नियंत्रण ठेवणारी व्यापक डिजिटल यंत्रणा.
- आकाशातून साऱ्या कार्यक्रमांवर अहर्निश (दिवसरात्र) निगराणी करणारे ड्रोन्स, प्रतिड्रोन्स (अँटीड्रोन्स), पाण्यातील ड्रोन्स.
- जमिनीवर पावलापावलांवर सिद्ध असणारी स्वयंसेवक, पोलीस दलं यांची उपस्थिती.
- संपूर्ण काळातील महाकुंभ कार्यक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), विविध प्रकारचे यंत्रमानव (रोबो) यांनी सर्वप्रकारे सुरक्षित नि सुनियोजित राखण्यासाठी व्यूहरचना आखली गेलीय.
- कित्येक कोटी येणाऱ्या- राहणाऱ्या- जाणाऱ्या भाविकांची निवासव्यवस्था करण्यासाठी उभारलेली विविध प्रकारची तंबूनगरं (टेंटसिटीज्).
असे अनेक पैलू यावेळच्या महाकुंभाच्या साजरीकरणासाठी केलेल्या व्यवस्थेचे आहेत. - महाकुंभातील मनोरंजन
यासाठी चार निरनिराळ्या ठिकाणी चोवीस भव्य मंच उभारले गेलेत. यांवरून लोकांचं रंजन करण्यासाठी विविध क्षेत्रांतील कलाकारांना संधी दिली जात आहे. सर्व कला, लोककला, पारंपरिक कला यांचे दर्शन असंख्यांसाठी आयोजित केलेय. एक-दोन नव्हे तर पाच हजार दोनशे पन्नास कलावंत, अभिनेते, गायक-वादक या मनोरंजनयज्ञात आपल्या सेवेच्या समिधा टाकणार आहेत.
या सांस्कृतिक कार्यक्रमांना जोडून बौद्धिक चर्चा, परिसंवाद यांचेही आयोजन केलेय. देश-विदेशांतील प्रसिद्ध कलाकार यात उत्स्फूर्तपणे सहभागी होताहेत हे विशेष. - आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन
अमृतस्नानाचा प्रारंभ पहाटे नागासाधूंनी केलेल्या शाहीस्नानाने होतो. यात साध्वी (स्त्रिया) नागांचा, अघोरपंथी साधुसंन्याशांचा समावेश असतो. त्यांनी अंगाला फासलेली राख, भस्म, विभूती, त्यांची वेशभूषा, केशभूषा, देहावर सर्वत्र माळलेले रुद्राक्ष इ. गोष्टींची सचित्र वर्णने आपण चवीने चघळतो. पण हे तितके महत्त्वाचे नाही.
महाकुंभाला लोटणाऱ्या अपार जनसमुदायाच्या एका अंशाच्या कानावर जरी शुद्ध अध्यात्माचे विचार पडले, दैनंदिन जीवनात उपासना कशी करावी या विषयावर मार्गदर्शन केले गेले तरी अनेकांच्या जीवनात शुभपरिवर्तन घडू शकते. हे लक्षात घेऊन अनेक आध्यात्मिक संस्था-संघटनांचे विद्वान, अनुभवी लोक सतत कार्यरत असतात. पुस्तक-प्रकाशन, ग्रंथप्रदर्शन यांतून आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार निश्चित होतो. - राष्ट्रीय एकता नि भावनिक एकात्मता
रामकृष्ण परमहंसांचं एक प्रसिद्ध वचन आहे- ‘समाजातील सर्व भेद नष्ट करून सर्व लोकांत सामंजस्य नि सामरस्य (समरसता) आणण्यासाठी आध्यात्मिक विचार नि त्यावर आधारित कुंभमेळा, तीर्थक्षेत्रातील वारी (जशी पंढरीची वारी) याशिवाय दुसरा उपाय आपल्या भारतदेशात नाहीच.’
‘सर्वसिद्धिकरः कुंभः’ अशी ख्याती असलेल्या महाकुंभमेळ्यातील अमृतस्नानाचे माहात्म्य सांगणाऱ्या दोन श्लोकांनी या लेखनाची सांगता करू- - प्रयागे स्नानमात्रेण सर्व पापैः प्रमुच्यते।
विशेषतः कुंभे पुण्यं यत्र देव सदा स्थितः॥ - गंगा तव दर्शनं पुण्यं स्नानं सर्व पापहारकम्।
कुंभे स्नानं महापुण्यं मुक्तिं ददाति मानवम्॥
दोन्ही श्लोकांचा अर्थ समजण्यास सोपा आहे.
आपण सर्व माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या सचित्र वर्णनावर एकाग्रचित्ताने चिंतन करू. नंतर डोळे मिटून मानसपटलावर ती दृश्ये जिवंत करून मानसस्नानपूजन करून मनातील सारे दोषदुर्गुण, खळमळ धुवून, त्याला उपासनेची जोड देऊन अखंड अमृतस्नान करण्याचा संकल्प करूया.