लोकाभिमुख नेता

0
2

भारतीय जनता पक्षाच्या गोवा प्रदेशाध्यक्षपदी अखेर पक्षाचे एक जुने कार्यकर्ते श्री. दामोदर ऊर्फ दामू नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचे सध्या भक्कम सरकार असल्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद हेही एक मोठे शक्तीकेंद्र बनलेले आहे. त्यामुळेच यावेळी ह्या पदावर अनेकांचा डोळा होता. मावळते प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचीही दुसऱ्यांदा ते पद सांभाळण्यास तशी ना नव्हती, परंतु एक व्यक्ती, एक पद ह्या भाजपच्या तत्त्वानुसार हे पद संपूर्णरीत्या पक्षकार्याला वाहून घेऊ शकणाऱ्या नेत्याकडेच असावे असा विचार पुढे आला आणि तानावडे यांना आपण पुन्हा त्या पदास इच्छुक नसल्याचे जाहीर करावे लागले. जी सहा सात नावे ह्या पदासाठी इच्छुक होती, त्यामध्ये ज्येष्ठता, जनसंपर्क आणि जातीचे गणित ह्या तिन्ही दृष्टींनी एकच नाव सर्वमान्य ठरेल असे होते ते म्हणजे दामू नाईक. पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून निवडणुकीतील जय पराजयाची तमा न बाळगता पक्षासाठी अविरत वाहून घेतलेला नेता अशी दामू नाईक यांची प्रतिमा राहिली आहे. त्यांचा फातोर्डा मतदारसंघ विजय सरदेसाई यांनी त्यांच्याकडून हिरावून घेतला असल्याने तेथे पुन्हा आपले राजकीय बस्तान बसवणे दामू यांच्यासाठी सोपे राहिलेले नाही. त्यामुळे पक्षकार्यासाठी पुरेसा वेळ त्यांच्यापाशी असल्याने प्रदेशाध्यक्षपदासारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदासाठी त्यांचा विचार झालेला आहे. भारतीय जनता पक्षाने आज आपले मजबूत असे संघटन गोव्याच्या खेड्यापाड्यांतून अगदी बूथ पातळीपर्यंत विस्तारलेले आहे. एकेकाळी राष्ट्रीय स्वयंंसेवक संघाच्या संघटनावर भारतीय जनता पक्षाला सर्वस्वी अवलंबून राहावे लागत असे. रा. स्व. संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसारख्या परिवारातील संघटनांमधून चांगले कार्यकर्ते राजकारणामध्ये उतरावे लागत असत. मात्र, जसजशी सत्ता हाती यायला सुरूवात झाली, तसतसे हे चित्र बदलत गेले. मनोहर पर्रीकर यांनी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि हळूहळू संघाचा पक्षसंघटनेवरील प्रभाव त्यांनी कमी करीत नेला. त्याचीच परिणती पुढे संघचालक सुभाष वेलिंगकर यांच्या बंडात आणि परिणामी रा. स्व. संघातच दोन गट पडण्यात झाली. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने गोव्यामध्ये सर्व प्रकारच्या तडजोडी करीत का होईना, परंतु आपली सत्ता कायम राखली आहे. त्यामुळे विविध पक्षांमधून नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठा ओघही पक्षाकडे लागला आहे. शिवाय पक्ष आणखी काही वर्षे तरी सत्तेत राहील हे स्पष्ट दिसत असल्याने इतर पक्षीय हवशे, गवशे आणि नवशे भाजपकडे धाव घेत राहिले आहेत. ह्या सगळ्या भाऊगर्दीमध्ये मूळचे भाजपचे कार्यकर्ते दिसणे दुरापास्त झालेले आहे. अलीकडेच झालेल्या मंडल अध्यक्षांच्या निवडीवेळीही केडर आणि हे उपरे यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. आज भाजपपाशी भरभक्कम सत्ताबळ आहे, परंतु बहुतेक सर्व आमदार हे संघपरिवाराबाहेरून आलेले आहेत. अनेकांचा तर संघाशी दुरान्वयेही संबंध नाही. आजचा भाजप वेगळा आहे. त्याला रा. स्व. संघाच्या कुबड्यांची आवश्यकता नाही अशी नेत्यांची भावना आहे. सत्ता हाती असल्याने कार्यकर्त्यांचीही पक्षापाशी आज वानवा नाही. परंतु शेवटी गुळाच्या ढेपेला चिकटणारे मुंगळे आणि पक्ष कार्यकर्ते यात फरक असतोच. त्यामुळे भाजपची खरी मदार खऱ्या तळमळीच्या कार्यकर्त्यांवरच राहणार आहे. अशा सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांचे संघटन बांधून त्यांना पक्षकार्याला जुंपून घेतानाच उपऱ्यांनाही पक्षात परकेपणा वाटू न देण्याची कसरत सदानंद तानावडे यांनी आपल्या कार्यकाळात केली होती. सरकारमध्ये पेचप्रसंग निर्माण झाले तेव्हा संकटमोचक म्हणूनही तानावडे वावरले. सर्वांना आपलेसे करून घेणे हा त्यांचा सर्वांत महत्त्वाचा गुण होता व तो पक्षाच्या विस्ताराला पूरकच ठरला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी उत्तम ताळमेळ त्यांनी साधला होता. सरकार आणि पक्ष यांच्यात असे उत्तम नाते असणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे आता तानावडेंनंतरही हे नाते कायम राहावे यासाठी दामू नाईक यांच्यासारखा जुनाजाणता कार्यकर्ता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आणून केडरला एक विश्वास देण्यात आलेला आहे. दामू नाईक हे गोव्यात बऱ्यापैकी संख्या असलेल्या भंडारी समाजाचे नेते आहेत हीही त्यांच्यासाठी एक जमेची बाजू ठरली आहेच, त्याचबरोबर पक्षाच्या केडरशी नाते असलेला आणि निवडणुकीतील जय पराजयाची तमा न बाळगता पक्षासाठी झटत आलेला त्यांच्यासारखा निष्ठावान लोकाभिमुख नेतो पक्षसंघटनेला अधिक बळकटी देईल असा विश्वास पक्षनेत्यांना वाटला असावा. दामू नाईक हे पक्षाची संघटना अधिक बळकट करतीलच परंतु पक्षाचे सरकार योग्य दिशेने काम करते आहे हेही पाहतील अशी आशा करूया.