बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. काल रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत पोलिसांनी आरोपीला शनिवारी रात्री 2 वाजता ठाण्यातील कामगार छावणीतून अटक केल्याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीकडे कोणतीही वैध भारतीय कागदपत्रे नाहीत. त्याच्याजवळ सापडलेल्या वस्तूंवरून तो बांगलादेशी असल्याचा संशय असल्याचे म्हटले आहे. संशयिताचेे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद (30) असल्याचे पोलिसांनी सांगितले. भारतात बेकायदेशीरपणे आल्यानंतर त्याने आपले नाव बदलून विजय दास असे ठेवले. तो 5-6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता. मुंबई पोलिसांनी मोहम्मद याला न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शनिवारी पोलिसांनी छत्तीसगडमधील दुर्ग येथून एका संशयिताला ताब्यात घेतले होते परंतु तो या प्रकरणात सहभागी असल्याचे आढळून आले नाही.