युद्धविरामाचा करार तीन टप्प्यांत
पहिल्या दिवशी तीन ओलिसांची सुटका
इस्रायल आणि हमास यांच्यातील 14 महिन्यांच्या युद्धानंतर युद्धविराम लागू झाला आहे. नियोजित वेळेपासून सुमारे 3 तासांचा विलंब झाला. सकाळी 11.30 वाजता लागू होणार होता, मात्र दुपारी 2:45 वाजता लागू झाला. इस्रायलने हमासवर युद्धविरामाच्या अटींचे पालन न केल्याचा आरोप केला असून काल सोडण्यात आलेल्या तीन इस्रायली ओलिसांची नावे हमासने दिलेली नाहीत, असे म्हटले आहे. यानंतर हमासने काल सोडलेल्या ओलिसांची यादी इस्रायलला पाठवली, त्यानंतर युद्धविराम लागू झाला. काल रविवारपासून लागू झालेल्या युद्धबंदीअंतर्गत हमासने पहिल्याच दिवशी 3 इस्रायली ओलिसांची सुटका केली. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता त्यांना सोडण्यात आले.
सुटका करण्यात आलेल्या ओलिसांमध्ये रोमी गोनेन नावाच्या महिलेचाही समावेश आहे. यापूर्वी शनिवारी इस्रायलच्या मंत्रिमंडळाने हमाससोबतच्या युद्धविराम कराराला मंजुरी दिली होती. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी करून याची पुष्टी केली आहे.
इस्रायलकडून 700
कैद्यांची सुटका
युद्धविराम करार 3 टप्प्यांत पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात हमास इस्रायलमधून अपहरण केलेल्या 33 ओलिसांची सुटका करणार आहे. तसेच, इस्रायली सैन्य गाझा सीमेपासून 700 मीटर मागे हटणार आहे. इस्रायलमधील न्याय मंत्रालयाने 95 पॅलेस्टिनी कैद्यांची यादीही जारी केली आहे, ज्यांची पहिल्या टप्प्यात सुटका केली जाईल. यामध्ये 69 महिला, 16 पुरुष आणि 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. इस्रायल 700 हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार आहे. त्यांच्या नावांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. या यादीत समाविष्ट असलेले अनेक लोक हत्येच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.