- अभिनव प्रकाश जोशी
डिसेंबर महिन्याचे दिवस असतात. वर्ष संपता-संपता गोव्यात मंद अशी थंडी पडायला सुरुवात होते. तशी थंडी ऑक्टोबरपासूनच सुरू होते, पण तुम्ही अधिकतर वेळा स्वेटर, मफलर, कानटोप्या, जाकीट वगैरे न घालता बाहेर पडू शकता. पण ‘गुलाबी थंडी’ म्हणावी ती डिसेंबरमध्येच! तर या थंडीबरोबर सुरू होतात ते काले. कित्येक मोठ्या देवस्थानांतही काला होतो, पण खरा काला बघायचा तो खेडेगावातलाच!
आमच्या मामाच्या माशेलनजीक वरगावलादेखील काला होतो. श्रीशांतादुर्गेच्या देवळात. देवळाकडे जाण्याच्या 2 एक किलोमीटरच्या रस्त्याभोवती उंचच उंच झाडे, अधूनमधून कुठे एखादा मळा. या देवळाभोवती काही मोजकीच घरे आणि बाकी सगळे शेत किंवा कुळागर. या शेता-कुळागरांत पाटाचे पाणी. थंड वारा, दव आणि बऱ्या प्रमाणात थंडी. एक-दोन नाटके. नाटकाचे संवाद बोलतानासुद्धा दातावर दात आपटतात. म्हणजे भावनाप्रधान नाटक करणे सोपे; ऐतिहासिक असल्यास कसलीच भीती नाही. अंगावरील भरजरी, जड कपडे थंडी दूर ठेवतात. पण जर सामाजिक किंवा कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक असेल तर मात्र पंचाईत. त्यातल्या त्यात कोट घातलेला दादा व भाटकार वाचला; चड्डी-बनियान घातलेला नोकर मात्र ठार! तर सांगायचं म्हणजे इतकी थंडी. तरीही वाड्यावरचे आणि गोव्यातील इतर भागांतले कितीतरी भाविक लोक ट्रंकेतले स्वेटर, मफलर, कानटोप्या घालून उमेदीने काल्याला येतात. देऊळ तसे काही एकदम मोठे नाही. देवळाभोवतीचे आवारही तेवढेच, देवळाला शोभेल असे. या थंडीच्या कुडकुड्यात आत सरताच पेट्रोलचे दिवे घेऊन 8-10 बाया फुलं आणि ओटीचं सामान घेऊन बसलेल्या असतात. दिव्यांचा, फुलांचा आणि भोवताली लावलेल्या उदबत्त्यांचा असा एक सामुदायिक वास तिथे असतो. थंडी वाजू नये म्हणून त्यांनी चेहऱ्याभोवती, कानावर कितीतरी कपडे बांधलेले असतात. अंगात असलाच तर एखादा खूप थंड्या बघितलेला स्वेटर. भोवती दोन्ही बाजूंनी खाजेकार. नेहमीसारखे खाजे, लाडू, आल्याची कापे, रेवड्या. त्यांच्या बाजूलाच एखाद-दुसरा चणेकार. चणे आणि शेंगदाण्यांवर कोळसे आणि अंगारे असलेले मातीचे भांडे. त्या भांड्याची गर्मीसुद्धा त्या थंडीत बरी वाटते! म्हणून कदाचित नाटक संपण्याआधीच चणे-शेंगदाणे संपत असावेत!
देवळात शिरून दागिने, फुलांनी नटवलेली देवीची मूर्ती दृष्टीस पडली की मन आपोआप प्रसन्न होऊन जाते. आईची ओटी भरून झाली की तीर्थ-प्रसाद घेऊन बाहेर यायचे. देवळाच्या एका बाजूला चहाचा मांड. आत दोनचार टेबले आणि विसेक खुर्च्या. नाटकाला असते तेवढीच गर्दी या चहाच्या मांडातदेखील असते. चण्याची गरम पातळ भाजी, उंडे, गरम भजी आणि गरमागरम चहा. हे सगळे पाहिले की काल्याला आल्याचे सार्थक होते.
नात्यातल्या, बाजूच्याच घरात गरम मुगाचे कढण शिजत असते. आत शिरताच वहिनी तोपात खालीपर्यंत दवला फिरवून पेल्यात कढण ओतून देतात. तो स्टीलचा ग्लास गरम असतो पण दोन्ही हातांनी पकडायचा. तेवढीच ऊब! फुक मारत-मारत ते कढण पिऊन संपत येतं आणि खाली उरलेली डाळ दिसते. सांडायची नाही! लहान मुलांना वहिनी चमचा देतात; आम्ही ती तशीच ग्लास उलटा करून त्याच्या मागे थोपटून ती तोंडात घेतो. ती तोंडात पडताच किती गरम असते त्याचा अंदाज येतो! तशाही परिस्थितीत ती गिळायची आणि वाफ बाहेर सोडायची!
लहान असताना तिथल्या खेळण्यांच्या दुकानावर चक्कर मारायची सवय लागली ती काही अजून सुटली नाही. मोह आवरला नाहीच तर बिनधास्त एखादी गाडी व खेळण्यातले पिस्तूल उचलून न्याहाळायचे. आधी आई एकतरी खेळणं घेऊन द्यायची, नाहीतर ओढत पुढे न्यायची. पुढे गेलेल्या आईची हाक ऐकली की खेळणीवाल्याला हात दाखवून पुढे जायचे. चणे, शेंगदाणे किंवा चणे-शेंगदाणे मिक्स असे बांधून घेऊन ते तोंडात टाकत खाजेकाराकडे मोर्चा वळवायचा. चणे तोंडात टाकत खाजे, लाडू, काजू आणि आल्याच्या कापांची पिशवी हातात धरायची. चुरचुरीत आले घातलेले परबांचे खाजे आणि तिखटशी आल्याची कापे. नाटक संपायला साधारण दोन-अडीच वाजत असावे. पिशव्या काखेत मारायच्या आणि त्या थंडीत कुडकुडत घर गाठायचे. तर याला म्हणतात काला! तसे पाहायला गेल्यास कुठच्याही काल्याचे मुख्य स्वरूप हेच. फक्त माटव लहान-मोठा आणि मांड कमी-जास्त! कुठेतरी गडगडासुद्धा. काला हा असा गजबजाटातला, खेड्यातला, अस्सल थंडीतला आणि आठवणीतला. त्याचे वर्णन आलंकारिक भाषेत कदाचित शोभणारही नाही!