>> पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल; आज पणजीत आयोजित कार्यक्रमात पक्षाकडून अधिकृत होणार घोषणा
गोवा प्रदेश भाजपच्या नव्या अध्यक्षांची आज (दि. 18) सकाळी पणजीत आयोजित एका कार्यक्रमात निवड जाहीर होणार असून, प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी आमदार तथा भाजप नेते दामू नाईक यांचा एकच अर्ज काल दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.
काल दामू नाईक यांनी पणजीतील भाजप मुख्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील बन्सल, मावळते प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री माविन गुदिन्हो व कार्यकर्ते उपस्थित होते. या पदासाठी अर्ज सादर करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. दामू नाईक यांचाच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध होणार असल्याचे कालच स्पष्ट झाले.
पणजीतील गोमंतक मराठा समाज सभागृहात आज सकाळी 10.30 वाजता नव्या गोवा प्रदेश भाजप अध्यक्षांची अधिकृत निवड जाहीर होणार असून, यावेळी मावळते प्रदेश अध्यक्ष व खासदार सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, तसेच पक्षाचे अन्य नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
गोवा प्रदेश भाजप अध्यक्षपदासाठी राज्यातून सहा नेत्यांची नावे पक्षाने पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती. त्यात पक्षाचे दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचा समावेश होता. यानंतर दामू नाईक व नरेंद्र सावईकर या दोन नावांवरच चर्चा सुरू होती. तसेच गेल्या दोन दिवसांपासून दामू नाईक यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याची चर्चा ऐकू येत होती.
फातोर्डा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दामू उर्फ दामोदर नाईक यांना 2012, 2017 व 2022 ह्या तीन विधानसभा निवडणुकांत मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. सततच्या पराभवाने खचून न जाता दामू नाईक यांनी पक्षासाठी आपले काम चालूच ठेवले. पहिल्यांदाच त्यांना पक्षातील मोठे पद पाप्त होणार असल्याने कालपासूनच त्यांचे हितचिंतक, मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला होता.
अत्यंत गरीब व खडतर अशा परिस्थितीचा सामना करीत दामू नाईक हे राजकारणात आले व भाजपचे दोन वेळा आमदार बनले. त्यांची जिद्द, चिकाटी व परिश्रम या बळावर आज ते पक्षाच्या मोठ्या विराजमान होणार आहेत, अशा प्रतिक्रिया त्यांच्या हितचिंतकांनी व्यक्त केल्या.