दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आश्वासनांचा पाऊस

0
2

>> जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना दरमहा देणार 2500

संपूर्ण देशाचे लक्ष आता दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे लागले असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा (संकल्प पत्र) प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यातील विविध आश्वासनांद्वारे भाजपने ‘सायलेंट वोटर’ मानल्या जाणाऱ्या महिलांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काल पक्षाचा जाहीनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याद्वारे भाजपने जनतेसाठी सरकारची तिजोरी उघडण्याचे आश्वासन दिलं आहे. मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या धर्तीवर भाजपने ‘महिला समृद्धी योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला 2,500 रुपये देण्याचे आश्वासन दिले. आम्ही सत्तेत आलो तर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत ही योजना जाहीर करू, असे आश्वासनही देण्यात आले आहे. तसेच एलपीजी सिलिंडरवर गरीब महिलांना 500 रुपयांचे अनुदान आणि होळी व दिवाळीला प्रत्येकी 1 सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. मातृ सुरक्षा वंदना अधिक बळकट करण्यासाठी 6 पोषण किट दिले जातील आणि प्रत्येक गर्भवती महिलेला 21,000 रुपये दिले जातील. अटल कँटीन योजनेअंतर्गत 5 रुपयांमध्ये भोजन दिले जाईल. तसेच भाजपने दिल्लीत आयुष्मान भारत योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.