अभिनेता सैफ अली खानवर काल झालेल्या प्राणघातक हल्ल्याने मुंबई हादरली. निव्वळ चोरीच्या उद्देशाने सदर तरूण सैफ अलीच्या पश्चिम वांद्य्रातील घरात शिरला होता आणि सैफ यांच्या घरी कामाला असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याशी त्याची आधी बाचाबाची आणि झटापट झाली आणि तिच्या मदतीला धावून गेलेल्या सैफ अली खान यांच्यावर सुऱ्याचे सपासप सहा वार झाले अशी प्रथमदर्शनी तरी माहिती आहे. अर्थात, सैफ अली खानसारख्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यावरील ह्या हल्ल्यामुळे नाना तर्कवितर्क व्यक्त होणे साहजिक होते आणि ते तसे व्यक्त झालेही. काळवीट हत्या प्रकरणी अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीने दिलेली धमकी, त्यानंतर सातत्याने त्याच्या हत्येचे झालेले प्रयत्न, सलमानच्या पनवेलच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा झालेला प्रयत्न, त्यानंतर मुंबईतील त्याच्या सदनिकेवर झालेला गोळीबार, सलमानचा मित्र बाबा सिद्दिकी याची त्याच्या मुलाच्या कार्यालयाबाहेरच झालेली हत्या हा सगळा घटनाक्रम अजून ताजा असल्याने सैफवरील सुरीहल्ल्यामागेही ही टोळी असू शकते का हा प्रश्न सर्वांना स्वाभाविकपणे पडला होता. शिवाय सैफ याच्या धर्माशी व त्याने लावलेल्या आंतरधर्मीय लग्नांशी या हल्ल्याचा संबंध असू शकतो का हाही संशय काही शंकासुरांनी व्यक्त केला. परंतु पोलीस अजूनही केवळ चोरीच्या उद्देशाने चोर त्याच्या घरात शिरला आणि सैफने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला ह्या आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. काल हल्लेखोर सैफच्या घराची आपत्कालीन शिडी चढत असतानाचे एक सीसीटीव्हीवरील छायाचित्रही पोलिसांनी जारी केले आहे आणि त्याच्या मागावर मुंबई पोलिसांची अनेक पथके आहेत. त्यामुळे हल्लेखोर लवकरच पकडला जाईल ह्याविषयी संशय बाळगण्याचे काही कारण नाही. ह्या घटनेचे निमित्त करून राजकारण करण्याचाही काल प्रयत्न झाला. मुंबई असुरक्षित आहे असा ठपका गृहखात्यावर ठेवण्याची संधी विरोधकांनी काल साधली. परळीमधील मस्साजोग येथील संतोष देशमुख ह्या सरपंचाची झालेली अत्यंत निर्घृण हत्या सध्या महाराष्ट्रात गाजते आहे. त्या प्रकरणात कित्येकजण गजाआड गेले आहेत आणि त्यांच्यावर मकोका ह्या कडक कायद्याखाली कारवाई सुरू आहे. ज्या प्रकारे संतोष देशमुखची हत्या झाली, त्यामुळे आणि सोमनाथ सूर्यवंशी नामक तरूणाच्या परभणीत पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूमुळे आधीच महाराष्ट्र सरकारवर व विशेषतः त्याच्या गृहखात्यावर चौफेर टीकास्र सुरू आहे. त्यात ह्या खळबळजनक घटनेमुळे विरोधकांच्या टीकेला अधिक धार चढली. सैफ अली खान मुंबईतील उच्चभ्रू वस्तीमध्ये एका इमारतीच्या अकराव्या मजल्यावर राहतो. असे असताना थेट त्याच्या सदनिकेमध्ये पहाटे चोर – तोही एकट्याने आत शिरणे हे तसे पटणारे नाही. सैफच्या घरात काम करणाऱ्या एका महिला नोकराची हल्लेखोराशी ओळख असावी व तिनेच त्याला आत प्रवेश दिला असावा व नंतर दोघांत बाचाबाची झाली असावी वगैरे तर्क काल मांडले गेले, परंतु पोलीस तपास प्राथमिक स्तरावर असताना अशा प्रकारच्या निष्कर्षाप्रत जाणे योग्य नव्हे. सैफवरील हल्ल्याच्या आधी इमारतीत कोणीही प्रवेश करताना सीसीटीव्हीत दिसत नसल्याने घरातील नोकरांवर संशय घेतला गेला, त्याच इमारतीमध्ये पॉलिशिंगचे काम सुरू असल्याने तेथील कामगारांवरही संशय घेतला गेला, परंतु शेवटी सीसीटीव्हीमध्ये इमारतीच्या आपत्कालीन जिन्यावरून चढून येताना एका तरूणाचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये सापडला आहे. त्यामुळे पोलीस निश्चितपणे आरोपीच्या मागावर पोहोचतील. प्रश्न फक्त एवढाच आहे की हा हल्ला केवळ चोरीच्या प्रयत्नास विरोध केल्याने झाला की त्यामागे काही अन्य कारण होते. तपास जसजसा पुढे सरकेल, तसतशी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, परंतु ज्या प्रकारे सैफसारख्या एका आघाडीच्या अभिनेत्यावर सुरीहल्ला झाला ती घटना निश्चितच नागरिकांना दहशत बसवणारी आहे. मुंबई असुरक्षित आहे असे म्हणणे योग्य नव्हे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल म्हणाले ते खरे असले, तरी देखील अशा प्रकारे एखाद्या सुरक्षारक्षक असलेल्या इमारतीमध्ये एखादा सुराधारी युवक अशा प्रकारे सहजगत्या चढून जाणे हे अशा मोठ्या इमारत संकुलांमधील सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल करणारेच आहे. त्यामुळे ह्या घटनेपासून धडा घेऊन अन्य निवासी संकुलांना आपल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये बदल करावे लागतील. सैफच्या जिवावरचे संकट काही जखमांवर निभावले हे त्याचे सुदैव, परंतु अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी गुन्हेगारांना कायद्याचा धाक असायला हवा. मुंबई पोलिसांच्या कर्तबगारीला हे आव्हान आहे, परंतु ते त्याला पुरून उरतील हे नक्की.