स्वयंसाहाय्य गटांना 312 कोटींचे अर्थसाहाय्य

0
3

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची जीएसआरएलएम बैठकीत माहिती

राज्यातील स्वयंसाहाय्य गट सदस्यांना अपघात मृत्यू विम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी सूचना काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियानच्या (जीएसआरएलएम) बैठकीत काल केली.
राज्यातील बचत गटांना बँकांनी 312 कोटी रुपयांच्या कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य वितरित केले आहे. गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत स्वयंसहाय्यता गटांद्वारे 480 ब्रँड विकसित करून चालवले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
स्वयं साहाय्य गटांनी एक पेड माँ के नामअंतर्गत 12,000 झाडे लावणे आणि जीएसआरएलएमद्वारे एसएचजी उत्पादनांच्या विक्रीसाठी सुपरमार्केट स्थापन करण्यास मान्यता देणे यासारख्या विविध उपक्रमांमध्ये योगदान दिले आहे.

गटांची संख्या वाढवणार

या बैठकीत राज्यातील स्वयंसाहाय्यता गटांची संख्या सुमारे 300 ते 400 ने वाढवणे, बचत गटांच्या नोंदींचे डिजिटायझेशन या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. सरकारने लखपती दीदींंसाठी 17,000 महिलांपर्यंतचे उद्दिष्ट ठेवले असून 17331 महिला बचत गट सदस्यांची निवड केली आहे. स्वयंसाहाय्य गट सदस्यांना अपघात मृत्यू विमा संरक्षित केला पाहिजे आणि सर्वांसाठी विमा योजना राबवण्यासाठी 141 सदस्यांची विमा सखी म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत 141 स्वयंसहायता गटांकडून 9 कँटीन चालवली जात आहेत. 2 रेल्वे स्थानकावर एक स्टेशन एक उत्पादन व्यतिरिक्त 5 तालुक्यांतील 2039 लाभार्थ्यांपर्यंत स्टार्ट-अप व्हिलेज एंटरप्राइझ कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला आहे. हंगामाच्या वेळी दररोज 2.5 लाखांपर्यंत विक्री होते, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. या बैठकीला बैठक ग्रामीण विकासमंत्री गोविंद गावडे, मुख्य सचिव, सरकारी अधिकारी, नाबार्डचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

फिरत्या निधीचे वितरण

गोव्यात राज्यातील 3250 बचत गटांसाठी 8.28 कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले आहे. या योजनेखाली केंद्र सरकारकडून 60 टक्के आणि राज्य सरकारकडून 40 टक्के अशा प्रकारे निधीचे वाटप केले जाते.