मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल आठ फुटीर आमदार अपात्रता प्रकरणात सभापतीच्या आदेशाला आव्हान देणारी काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांची याचिका निकालात काढली. आता, चोडणकर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी नव्याने याचिका दाखल करणार आहेत.
चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आठ आमदारांच्या अपात्रताप्रकरणी दाखल केलेली याचिका मागे घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आमदार अपात्रता प्रकरणात गोवा विधानसभेच्या सभापतीच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. चोडणकर यांनी दाखल केलेल्या अशाच प्रकरणावर उच्च न्यायालयाने यापूर्वी निकाल दिला होता. त्यामुळे ही आमदार अपात्रता याचिका निकालात काढावी, असा युक्तिवाद चोडणकर यांचे वकील ॲड. अभिजित गोसावी यांनी केला होता. खंडपीठाने काँग्रेसच्या 10 फुटीर आमदारांसंदर्भात दिलेला जुना आदेश कायम ठेवत चोडणकर यांची सभापतीच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका निकालात काढली आहे. आपणाला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास पुरेसा वेळ मिळणार असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.