‘भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले, ते राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर’ असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. या वक्तव्याचा राहुल गांधींनी काल चांगलाच समाचार घेतला. मोहन भागवत यांचे हे विधान म्हणजे आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा, तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाचा अपमान आहे. भागवतांची ही टिप्पणी म्हणजे आपल्या राज्यघटनेवर हल्ला आहे. हे विधान म्हणजे देशद्रोह आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली.
काल दिल्लीत काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. इंदिरा भवन या नावाने काँग्रेसचे नवे मुख्यालय ओळखले जाणार आहे. इंदिरा भवनच्या उद्घाटन प्रसंगी राहुल गांधींनी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘रामलल्लाची मूर्ती ज्या दिवशी राम मंदिरात स्थापन झाली ती तिथी उत्सव म्हणून साजरी करावी कारण त्यानंतर देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले, असे विधान मोहन भागवत यांनी केले होते. 13 जानेवारीला इंदूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले होते. या वक्तव्याचा समाचार राहुल गांधींनी घेतला. मोहन भागवत हे दर दोन ते तीन दिवसांनी देशाला हे सांगत असतात की त्यांचे देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाबाबत विचार काय आहेत. त्यांनी नुकतेच केलेले वक्तव्य हा देशद्रोह आहे. त्यांच्या म्हणण्याचा सरळ अर्थ हाच होतो की संविधानाचे काही औचित्यच नाही. इंग्रजांच्या विरोधात जी लढाई देशाने लढली, त्याला काही अर्थ नाही, असे राहुल गांधी म्हणाले. भागवतांच्या मते इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला महत्त्व नव्हते. मोहन भागवत यांनी अशी विधाने अन्य कोणत्याही देशात दिली असती, तर त्यांना अटक झाली असती. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला असता. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही असे म्हणणे हा देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. हा अपमान मोहन भागवत यांनी केला आहे. आता ही वेळ आली आहे की ते जी वायफळ बडबड करतात ती आपण ऐकणे बंद केले पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.