आधी न्यायालयीन कोठडी; नंतर लगेचच जामीन मंजूर

0
4

फोंडा पालिकेच्या बनावट उत्पन्न दाखल्या प्रकरणी न्यायालयाने नगरसेवक शिवानंद सावंत व सदानंद प्रभूगावकर या दोघांना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर काही वेळातच जामीन अर्जावर सुनावणी घेतली. त्यानंतर दोघांचीही जामिनावर सुटका करण्याचा आदेश दिला. फोंडा पोलिसांनी गुरुवारी नगरसेवक शिवानंद सावंत यांना अटक केली होती. त्याआधी सदानंद प्रभूगावकरला अटक केली होती.
आपली बनावट स्वाक्षरी व पालिकेचा शिक्का वापरून बनावट उत्पन्न दाखला दिल्या प्रकरणी फोंडा पालिकेचे मुख्याधिकारी योगीराज गोसावी यांनी पोलीस तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून नगरसेवक शिवानंद सावंत व दाखला घेणाऱ्या सदानंद प्रभुगावकर या दोघांना अटक केली होती. शुक्रवारी न्यायालयाने दोघांना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर जामिनासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी घेताना अवघ्या काही वेळात दोघांची जामिनावर सुटका झाली.