मंदिरे व मठ यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या आरोपावरून साहित्यिक दत्ता दामोदर नायक यांच्याविरुद्ध झाला असून, त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काल दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निवाडा सोमवारपर्यंत राखून ठेवला.
न्यायाधीश क्षमा जोशी यांच्या न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली. नायक यांच्यातर्फे बाजू मांडणारे ॲड. क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो यांनी सदर वक्तव्य भावना दुखावण्याच्या गुन्ह्याखाली येत नाही, असा दावा केला. नायक यांनी भाजप सरकारच्या विरोधात याच मुलाखतींत भाष्य केल्याने त्यांना सतावण्यासाठी त्यांच्याविरोधात हा गुन्हा नोंद केला असावा, असा दावा नायक यांच्या वकिलांनी केला.
सरकारी वकील व्ही. जी. कोस्ता यानी हे प्रकरण प्राथमिक अवस्थेत असल्याने पोलिसांना त्यांची आणखी चौकशी करण्यासाठी वेळ हवा आहे, असे न्यायालयात सांगितले.
तत्पूर्वी, काल सकाळी दत्ता नायक यांनी काणकोण पोलीस स्थानकात हजेरी रावली. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र चिराग नायक हे उपस्थित होते.