राज्यात आदिवासी उपयोजना, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत गोवा दूध संघाला नियमितपणे दूध पुरवठा करणाऱ्या दुग्ध सहकारी संस्थांना दैनंदिन संकलनाच्या आधारे प्रतिवर्षी 3.75 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.
राज्य सरकारच्या सहकार खात्यातर्फे डेअरी सहकारी संस्थांसाठी पायाभूत सुविधा विकास योजनांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. राज्यातील दुधाच्या उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने ही आर्थिक मदत योजना राबविण्यात येत आहे. आदिवासी आणि अनुसूचित जाती उपयोजनेखाली दरदिवशी 1250 लीटर दुधाच्या पुरवठा करणाऱ्या दूध सहकारी संस्थेला 3.75 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. दरदिवशी 75 लीटर दुधाचा पुरवठा करणाऱ्या संस्थेला 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. दरदिवशी तीनशे, पाचशे, एक हजार लीटर दुधाचा पुरवठा करणाऱ्यांसाठी आर्थिक मदतीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. 15 टक्के एसटी, एससी सभासद असलेली दूध सहकारी संस्था या योजनेसाठी पात्र आहे.
राज्यातील इतर डेअरी सहकारी संस्थांसाठी पूर्वी अधिसूचित करण्यात आलेले 30 हजार रुपये ते 1.50 लाख रुपये प्रति वर्ष अनुदान चालू राहील, असेही सूचनेत म्हटले आहे.