तीन रस्त्यांची कामे 20 जानेवारीपर्यंत पूर्ण

0
3

पणजी शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली काकुलो मॉल ते सांडपाणी निचरा प्रकल्प, काकुलो सर्कल ते सांतइनेज जंक्शन आणि पोलीस स्थानक परिसर या तीन रस्त्याची कामे येत्या 20 जानेवारीपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत, अशी माहिती स्मार्ट सिटी प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला काल दिली. उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पणजी स्मार्ट सिटीशी संबंधित जनहित याचिकेवर काल सुनावणी घेण्यात आली. यावेळी याचिकादाराने स्मार्ट सिटीची कामे नव्याने सुरू करण्यात आल्यामुळे होणारे हवा प्रदूषण, वाहतूक व्यवस्था व वाहतूक कोंडी व इतर समस्यांची माहिती दिली. न्यायालयाने स्मार्ट सिटी प्रशासनाला हवा प्रदूषण आणि वाहतूक व्यवस्थेबाबत हाती घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत दि. 13 जानेवारीला सविस्तर माहिती देण्याचा निर्देश दिला आहे.