>> मार्ना-शिवोलीतील महिलेची फसवणूक
>> आंध्रप्रदेशातून संशयित आरोपीस अटक
>> बँक खात्यातील 40 लाख रुपये गोठवले
मार्ना-शिवोली येथील एका महिलेला आंध्रप्रदेशमधील एका भामट्याने ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून सुमारे 1 कोटी रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने संशयित यरमला व्यंकटेश्वरलू (53) याला विजयवाडा-आंध्रप्रदेश येथे ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला काल गोव्यात आणून रितसर अटक केली. तसेच त्याच्या बँक खात्यातील 40 लाख रुपये गोठविले आहेत, अशी माहिती सायबर गुन्हा विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी काल दिली.
हा फसवणुकीचा प्रकार गेल्या 26 ते 28 डिसेंबर 2024 या काळात घडला होता. मार्ना-शिवोली येथील पीडित महिलेला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून भामट्याने फोन केला. त्याने आपण दिल्ली पोलिसांच्या गुन्हा विभागातील पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून तिच्याविरोधात एका प्रकरणामध्ये गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती महिलेला दिली. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या ‘डिजिटल अरेस्ट’बाबत बनावट दस्तऐवज पाठवून 1 कोटी रुपये तीन वेगवेगळ्या बँक खात्यांत जमा करण्याची सूचना केली. पीडित महिलेने अटकेच्या भीतीपोटी 1 कोटी रुपयांचा भरणा विविध खात्यांत केला. त्यानंतर सदर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तिने गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाकडे तक्रार दाखल केली.
सायबर गुन्हा पोलीस विभागाच्या पथकाने पैसे जमा करण्यात आलेल्या बँक खात्यांचा शोध घेतला. त्यावेळी खातेदाराचे नाव उघडीस आले. त्याच्या बँक खात्यात 40 लाख रुपये जमा झाले होते. त्यानंतर पोलिसांनी संशयितावर पाळत ठेवून विजयवाडा-आंध्रप्रदेश येथे त्याला ताब्यात घेण्यात यश मिळविले. पोलीस उपनिरीक्षक नवीन नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
संशयित यरमला व्यंकटेश्वरलू हा उच्च शिक्षित असून, तो व्यावसायिक आहे. पोलिसांनी बँक खात्यातील 40 लाख रुपये गोठवून त्याचा एक मोबाईल फोन हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
फसवणुकीला बळी पडू नका;
पोलिसांशी त्वरित संपर्क साधा
सध्या फसवणुकीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ईडी, पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तींपासून नागरिकांनी सावध राहिले पाहिजे. याबाबत शंका किंवा संशय आल्यास नागरिकांनी त्वरित सायबर पोलीस विभागाशी संपर्क साधला पाहिजे, असे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.
1930 हेल्पलाईनवर संपर्क साधा
डिजिटल फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने 1930 ही विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे. हा चार अंकी क्रमांक वापरकर्त्यांना सायबर फसवणुकीमुळे झालेल्या कोणत्याही आर्थिक नुकसानीची माहिती देण्यास मदत करेल. तसेच फसवणूक झाल्यास 60 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 1930 वर तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. तुम्ही जर वेळीच हा क्रमांक डायल केला, तर तुम्हाला तुमचे गेलेले पैसे परत मिळू शकतात.
केंद्र सरकारकडून जनजागृती, तरीही….
गेल्या काही दिवसांपासून देशभरात सायबर फसवणुकीच्या मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. सीबीआय, कस्टम्स आणि अन्य अधिकारी असल्याची बतावणी करत, किंवा डिजिटल अरेस्टची भीती दाखवत लोकांना गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. विशेषत: दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला कॉल केल्यास सायबर गुन्ह्यांविषयीची कॉलरट्युन ऐकू येते, त्यात अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. तरी देखील देशभरात असे फसवणुकीचे प्रकार घडत आहेत.