>> केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा; 8 फेब्रुवारीला निकाल
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम काल अखेर जाहीर झाला. त्यानुसार येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून, मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेत या संदर्भात सविस्तर माहिती दिली. दरम्यान, ईव्हीएमवरील आरोंपावरही निवडणूक आयोगाने उत्तर देत सर्व आरोप खोडून काढले.
राजीव कुमार यांनी काल दुपारी पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 10 जानेवारी रोजी निवडणुकांची अधिसूचना जारी केली जाईल. 17 जानेवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. 18 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 20 जानेवारी ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख असेल. यानंतर 15 दिवसांनी म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यानंतर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केले जातील. विद्यमान दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. दरम्यान, निवडणुकीची घोषणा केल्यानंतर दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे.
दिल्लीत ‘आप’चेच वर्चस्व
दिल्लीतील गेल्या तीन विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहता इथे आम आदमी पक्षाचेच वर्चस्व राहिल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच विधानसभा निवडणुकांपैकी तीन विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीत आम आदमी पक्षाने आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात 2011 सालच्या भ्रष्टाचारविरोधातील आंदोलनातून आम आदमी पक्षाचा झालेला जन्म दिल्लीच्या राजकारणाला संपूर्ण कलाटणी देणारा ठरला. काँग्रेससाठी पर्याय म्हणून भाजपने दिल्लीच्या राजकारणात पाय रोवण्याचा सक्षम प्रयत्न 2013 साली केल्याचे दिसून आले; पण पुढच्या दोन निवडणुकीत भाजपची दाणादाण उडाली आणि आपने दिल्लीत 2015 मध्ये 67 जागांवर, तर 2020 मध्ये 62 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला.
1 कोटी 55 लाख मतदार
दिल्लीत एकूण 1 कोटी 55 लाख मतदार असून त्यातले 83.49 लाख पुरुष मतदार, तर 71.74 लाख महिला मतदार आहेत. यामध्ये 25 लाख 89 हजार तरुण मतदार असून, त्यातही 2.08 लाख नवमतदार आहेत.
58 जागा खुल्या प्रवर्गासाठी
70 विधानसभा जागांसाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीकर मतदान करणार आहेत. त्यात 58 जागा खुल्या प्रवर्गातल्या असून, 12 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.
ईव्हीएमवरील आरोपांवरही दिले स्पष्टीकरण
दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएममधील छेडछाड, मतदार याद्यांमधील घोळ आणि वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेवटच्या पाच तासांत मतदानाची टक्केवारी कशी वाढली याबाबतही स्पष्टीकरण दिले.