ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठी आता मिळणार दोन वर्षांपर्यंत मुदत

0
4

>> माविन गुदिन्हो यांची माहिती; नितीन गडकरींकडून गोमंतकीयांना दिलासा

केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात ड्रायव्हिंग चाचणी केंद्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणाची मुदत एक वर्षावरून दोन वर्षांपर्यंत वाढवण्याची मागणी मंजूर केली आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी नवी दिल्ली येथे वाहतूकमंत्र्यांच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर काल दिली.

गोवा राज्यात लोकसंख्येचे प्रमाण 20 लाखांच्या खाली असल्याने ड्रायव्हिंग चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळत नव्हती. राज्यात ड्रायव्हिंग चाचणी केंद्राची गरज लक्षात घेऊन हा मुद्दा नितीन गडकरी यांच्यासमोर मांडून कायदा थोडा शिथिल करण्याची विनंती केली. तसेच, ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत पूर्ण झाल्यानंतर नूतनीकरणासाठी एक वर्षाची मुदत असते. गोव्यातील काही लोक विदेशात कार्यरत असल्याने त्यांची ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठी गैरसोय होत होती. त्यामुळे नूतनीकरणासाठी तीन वर्षे मुदत देण्याची मागणी केली होती. तथापि, दोन वर्षे मुदत देण्याचे मान्य करण्यात आले आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.
वाहतूकमंत्र्यांच्या परिषदेत प्रमुख वाहतूक धोरणे, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सहकार्य वाढवणे आणि प्रादेशिक आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी एकसंध धोरणे यावर चर्चा करण्यात आली, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

नितीन गडकरी यांच्या हस्ते येत्या 21 जानेवारीला मुरगाव तालुक्यातील हार्बर ते महामार्ग आणि दाबोळी जंक्शन येथील उड्डाण पूल या दोन रस्ता प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.