>> नवनिर्वाचित भाजप मंडळ अध्यक्षांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन; पणजीत 36 मंडळ अध्यक्षांचा केला सन्मान
गोवा विधानसभेची निवडणूक 2027 साली होणार असून, नवनिर्वाचित भाजप मंडळ अध्यक्षांनी या निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठीचा विडा उचलावा, असे आवाहन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पक्षाने आता तरुण म्हणजे 45 वर्षांखालील मंडळ अध्यक्षांकडे आता सूत्रे सोपवलेली असून, त्यामुळे आता पक्ष तरुणांच्या हाती गेला आहे. केंद्रीय नेतृत्वाने देशभर पक्षाचे 45 वर्षांखालील मंडळ अध्यक्ष निवडून आणता यावेत, यााठी वयोमर्यादा खाली आणण्याचेही त्यांनी नमूद केले.
भाजपच्या निवनिर्वाचित 36 मंडळ अध्यक्षांचा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, दामू नाईक, माजी खासदार विनय तेंडुलकर आदी हजर होते.
नव्या मंडळ अध्यक्षांची निवड झालेली असली तरी माजी अध्यक्षांनी आपली जबाबदारी संपली असे समजू नये. त्यांनी नवनियुक्त अध्यक्षांना मार्गदर्शन करावे. माजी मंडळ अध्यक्षांची आता विविध संघटनांवर नियुक्ती करून त्यांच्यावरही वेगळी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आमदाराएवढाच प्रत्येक मतदारसंघातील मंडळ अध्यक्षही महत्वाचा असून, पक्ष विजयात मंडळ अध्यक्षांची भूमिका ही फार महत्त्वाची असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
भाजपचे गोव्यात 4.25 लाख सदस्य
गोव्यात भाजपचे 4.25 लाख एवढे सदस्य असून, राज्यात पक्षाची संघटना खूप बळकट झालेली आहे आणि त्यामुळे पुढील गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने विजयी होणार असल्याचा दावा अरुण सिंह यांनी केला. पक्षाचे कार्यकर्ते हेच पक्षाचे मालक आहेत व तेच दिवस-रात्र पक्षासाठी काम करून पक्षाला विजयी करण्याचे काम करीत आहेत. केंद्रात तसेच 20 राज्यांत सत्तेवर असलेली भाजप हा देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचे ते म्हणाले.