दक्षिण कोरियात विमान कोसळून 179 ठार

0
4

>> अपघातातून केवळ दोघांना वाचवण्यात यश

>> लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने अपघात

दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर जेजू एअरचे विमान कोसळून झालेल्या अपघातात विमानातील 179 जणांचा मृत्यू झाला. तर केवळ दोघांना वाचवण्यात यश आले आहे. या विमानात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्ससह एकूम 181 लोक होते. बचाव पथकाने यातील केवळ 2 जणांना जिवंत वाचवले. मृतांमध्ये 84 पुरुष आणि 85 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत 11 मृतदेहांची ओळख पटलेली नाही.

रविवारी भारतीय वेळेनुसार पहाटे 5:37 वाजता (स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:07) हा अपघात झाला. बँकॉकहून येणारे विमान विमानतळावर उतरणार होते, मात्र लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने विमानाची चाके उघडली नाहीत व हा अपघात झाला.
विमानाचे बेली लँडिंग आपत्कालीन परिस्थितीत करण्यात आले. यामध्ये विमानाची बॉडी थेट धावपट्टीवर आदळते. मात्र सदर विमान धावपट्टीवरून घसरले आणि विमानतळाच्या सीमा भिंतीला धडकले. त्यात स्फोट होऊन आग लागली.

अपघातापूर्वी, मुआन विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) कडून विमानाशी पक्ष्याची टक्कर झाल्याबद्दल अलर्ट पाठविला गेला होता. विमानाच्या लँडिंग गियरमध्ये बिघाड होण्याचे हे देखील एक कारण असू शकते.

जेजू एअरलाइन्सचे फ्लाइट 2216 बँकॉकहून येत होते. विमानतळाच्या कुंपणाला आदळल्यानंतर आग लागली. कुंपणावर आदळताच मोठा स्फोट झाला आणि विमानाची संपूर्ण बॉडी आगीत भस्मसात झाली, काही वेळाने फ्रेम जळून खाक झाली. विमानातील इंधन वेगाने जळत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बचाव यंत्रणांना संघर्ष करावा लागला. आग आटोक्यात येईपर्यंत विमानाची संपूर्ण बॉडी जळाली होती. बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जळालेल्या विमानातून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनास्थळावरून धुराचे लोट उठत होते. आगीमुळे विमानाच्या मागील गेटमधून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये 173 दक्षिण कोरियाचे आणि 2 थायलंडचे नागरिक होते. तर वाचलेले दोघेही चालक दलाचे सदस्य आहेत.

दुसऱ्यांदा अपघात

जेजू एअरलाइन्सचे विमान कोसळले ते अमेरिकन कंपनी बोईंगचे 737-800 विमान होते. विमानाने दोनदा विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला. लँडिंग गिअर न उघडल्याने विमान पहिल्यांदा उतरू शकले नाही. यानंतर विमानाने विमानतळाला प्रदक्षिणा घातली. दुसऱ्यांदा वैमानिकाने लँडिंग गिअरशिवाय विमान बेली लँड करण्याचा निर्णय घेतला. पक्षी विमानाच्या पंखाला आदळल्यामुळे लँडिंग गिअर खराब झाले आणि लँडिंग करताना उघडता आले नाही असाही दावा यावेळी करण्यात आला. मुआन विमानतळाच्या अग्निशमन अधिकाऱ्याने विमानातील आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र, आग विझवण्यासाठी 43 मिनिटे लागली असल्याचे सांगितले.

अपघाताबद्दल माफी

जेजू एअरचे सीईओ किम ई-बे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून लोकांची माफी मागितली आहे. अपघातामागचे कारण काहीही असो, मी सीईओ म्हणून संपूर्ण जबाबदारी घेतो असे किम यांनी सांगितले.
मदत आणि बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत होते. हे विमान यापूर्वी कधीही कोसळलेले नाही. सध्या पक्ष्यांच्या धडकेने लँडिंग गिअरमध्ये बिघाड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.