>> भारतीय अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अवघा देश बुडाला शोकसागरात
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना काल रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2004 ते 2014 अशी सलग दहा वर्षे ते देशाचे पंतप्रधान होते. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधींसह अन्य नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंग हे गेल्या काही महिन्यांपासून राजकारणापासून दूर होते. ते यंदाच्या एप्रिल महिन्यातच राज्यसभेतून निवृत्त झाले होते. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर रात्री 8 च्या सुमारास त्यांना दिल्लीतील एम्सच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान 9.51 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 92 वर्षीय मनमोहन सिंग अनेक दिवसांपासून आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत होते. याआधीही प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन त्यांचे कुटुंब भारतात आले. डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. तेथून त्यांनी 1952 मध्ये अर्थशास्त्रात पदवी घेतली होती. 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात गेले, तिथे त्यांनी 1957 मध्ये अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी प्राप्त केली. तसेच त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली.
सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केले. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. 1982 ते 1985 या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केले. त्यानंतर 1985 ते 1987 या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे अध्यक्षपदावर काम केले होते.
1998 ते 2004 च्या काळात मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या विरोधी पक्षनेत्याची धुरा सांभाळली होती. 2004 साली ज्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारने बहुमत गाठले, त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले. 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली; पण मनमोहन सिंग यांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही.
काँग्रेसकडून सर्व कार्यक्रम रद्द
कर्नाटकातील बेळगाव येथे सुरू असलेली काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठक रद्द करण्यात आली आहे. याशिवाय 27 डिसेंबर रोजी होणारे सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.
भारतीय अर्थक्रांतीचे जनक
1991 पासून मनमोहन सिंग यांच्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रिपदाची धुरा सांभाळली. भारताच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. त्यामुळे ते भारतीय अर्थक्रांतीचे जनक म्हणून नावाजले जातात. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री पदावर असलेल्या मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली.
माझा मार्गदर्शक गमावला : राहुल गांधी
मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातली जाण खूप उत्तम होती. त्याचा आदर्श देश कायम घेत राहिल. श्रीमती कौर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. मी आज माझे आदर्श आणि माझे मार्गदर्शक गमावले आहेत. काँग्रेस पक्षातले माझ्यासारखे लाखो लोक मनमोहन सिंग यांची आठवण अभिमानाने काढतील, त्यांना कायम स्मरणात ठेवतील, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
विद्वान, मृदू, मितभाषी अन् संवेदनशील नेता…
विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जाते.
जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते; जे 10 वर्षे देशाचा कारभार सांभाळू शकले.
2004 ते 2014 अशी सलग दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते.
मनमोहन सिंग यांनी 22 मे 2004 ला भारताचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती.
22 मे 2009 साली ते पुन्हा भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.
तसेच 1998 ते 2004 या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. 33 वर्षे ते खासदार होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
भारताने आपले सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. मनमोहन सिंग यांना गमावले आहे. नम्रपणा जोपसाणारे मनमोहन सिंग सन्माननीय अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी विविध सरकारी पदांवर तसेच अर्थमंत्री म्हणून काम केले आणि गेल्या काही वर्षांत देशाच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. संसदेतील त्यांचा कार्यकाळही अभ्यासपूर्ण होता. पंतप्रधान या नात्याने त्यांनी देशातील जनतेचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
प्रियांका गांधी यांनीही व्यक्त केल्या भावना
राजकारणात फार कमी लोकांनी सरदार मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळतो. त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल. विरोधकांच्या अन्यायकारक आणि गंभीर वैयक्तिक हल्ल्यांना बळी पडूनही राष्ट्रसेवेच्या आपल्या वचनबद्धतेत ते स्थिर राहिले. ते खऱ्या अर्थाने समतावादी, हुशार, प्रबळ इच्छाशक्ती आणि शेवटपर्यंत धैर्यवान होते. राजकारणाच्या खडबडीत जगातला एक अनोखा प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस असे त्यांची इतिहासात नोंद राहील, अशा भावना काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी व्यक्त केल्या.