>> सिद्दिकी व्हायरल व्हिडिओ प्रकरण; पोलिसांकडून सतावणूक : पालेकर
भूमाफिया सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान व्हायरल व्हिडिओ प्रकरणामध्ये आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांची काल सलग दुसऱ्या दिवशी जुने गोवे पोलिसांनी दोन तास चौकशी केली. सिद्दिकीच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात साक्षीदार म्हणून पालेकर यांची चौकशी करण्यात आली. भाजपच्या काही नेत्यांनी ॲड. अमित पालेकर हे सिद्दिकीची ‘वकिली’ करीत असल्याचा आरोप केला आहे. मात्र पालेकर यांनी भाजप नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांचे खंडन केले आहे.
सिद्दिकीने पहिला व्हिडिओ अमित पालेकर यांना पेन ड्राईव्हवर पाठविला होता. त्यानंतर तो पहिला व्हिडिओ काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर व्हायरल केला होता. फरार झालेल्या सिद्दिकीला अटक होण्यापूर्वी सोमवारी त्याचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यात त्याने अमित पालेकर यांच्यावर आरोप केले आहेत.
या दुसऱ्या व्हिडिओवरून ॲड. अमित पालेकर यांनी भाजपवर टीका केली आहे. पहिल्या व्हिडिओत सिद्दिकीने नावे घेतलेले भाजप नेते स्वच्छ असल्याचे दाखविण्यासाठी त्याच्या दुसऱ्या व्हिडिओचा ‘वॉशिंग मशीन’ म्हणून वापर करण्यात आला आहे, अशी खोचक टीका ॲड. पालेकर यांनी चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना काल केली.
सिद्दिकी खान हा पोलीस कोठडीतून पोलीस शिपायाच्या मदतीने पळून जातो. त्याच्या पलायनाला जबाबदार असलेल्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई केली जात नाही. उलट आपण यासंदर्भात माहिती दिली म्हणून आपणाला लक्ष्य बनविले जात आहे. पहिल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पोलिसांना सोमवारी सर्व माहिती दिलेली असताना मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी पोलीस स्थानकावर बोलाविले. ही एक प्रकारची सतावणूक आहे, असेही ॲड. पालेकर म्हणाले.
दुसऱ्या व्हिडिओत सिद्दिकी ‘स्क्रिप्ट’ वाचतोय : पालेकर
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दुसऱ्या व्हिडिओचा स्रोत पोलिसांनी शोधून काढावा. त्यात सिद्दिकी खान हा लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. राज्यातील भाजप सरकारसाठी आम आदमी पक्ष आणि आपण मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे आपल्याला आणि आम आदमी पक्षाला लक्ष्य करण्यासाठी सिद्दिकीच्या नव्या व्हिडिओचा वापर केला जात आहे, असा आरोप ॲड. पालेकर यांनी केला.
सिद्दिकीला सात दिवसांची पोलीस कोठडी
पणजी येथील प्रथम वर्ग न्यायालयाने सराईत गुन्हेगार सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश काल दिला. रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीतून पलायन केलेल्या सिद्दिकीला केरळमध्ये ताब्यात घेऊन सोमवारी संध्याकाळी गोव्यात आणण्यात आले होते. त्यानंतर जुने गोवे पोलिसांनी त्याला पलायन प्रकरणात रितसर अटक केली होती.