म्हादई : बैठक पुढे ढकलल्याने विजय सरदेसाई यांचा संताप

0
3

म्हादईप्रश्नी स्थापन करण्यात आलेल्या गोवा विधानसभा सभागृह समितीची 27 डिसेंबर रोजी होऊ घातलेली बैठक पुढे ढकलून आता ती 10 जानेवारी रोजी घेण्याचे सरकारने ठरवल्याबद्दल गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना संताप व्यक्त केला. दरम्यान, ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम हे सुट्टीवर असल्याने परवाची बैठक रद्द केल्याचे सूत्रांनी सांगितले.

जानेवारी 2023 मध्ये स्थापन केलेल्या या समितीची आतापर्यंत केवळ एकच बैठक झालेली असून यावरून म्हादईप्रश्नी गोवा सरकार गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप काल विजय सरदेसाई यांनी केला. गेल्या जुलै महिन्यात आपण सरकारकडे म्हादईप्रश्नी सभागृह समितीची बैठक विनाविलंब घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी चतुर्थीनंतर बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, चतुर्थीनंतरही बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये आपण सरकारकडे पत्र लिहून बैठक बोलवा अशी मागणी केली होती. त्यानंतर सरकारने 27 डिसेंबर रोजी बैठक निश्चित केली होती. मात्र, अचानक काल सरकारने 27 रोजीची बैठक रद्द झाल्याचे कळवून आता ती 10 जानेवारी रोजी होणार असल्याचे कळवले आहे, असे सरदेसाई म्हणाले. 10 तारखेच्या बैठकीच्या दिवशी गोवा सरकारने म्हादईप्रश्नी श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही सरदेसाई यांनी केली आहे.