- डॉ. जयंती नायक
नाताळ सण अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. लोकांची खरेदीसाठी बाजारात एकच झुंबड उडाली आहे. गोव्यातील नाताळ सणाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा सण येथील मातीशी जुळलेल्या खास प्रथा-परंपरा पाळून, त्याचबरोबर चर्चशी संबंधित कर्मकांडे करून साजरा केला जातो. ख्रिस्ती समाजातील सर्व सणांमध्ये ‘नाताळ’ हा सर्वात मोठा सण असल्याने घरांची डागडुजी, साफसफाई, रंगरंगोटी महिनाभर आधीच सुरू झालेली आहे. परदेशांतून लोकही गावघरी परतत आहेत. एकूण सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा!
25 डिसेंबर हा नाताळाचा दिवस. जगभरातील ख्रिस्ती समाज या दिवशी उत्सव साजरा करतो. कुठे या सणाला ‘ख्रिसमस’ या नावाने ओळखले जाते, तर कुठे ‘नाताळ.’ नाताळ शब्द स्पेनीश भाषेतील असून तो ‘छरींरश्रळी’ या लॅटिन शब्दातून घडलेला आहे. त्याचा अर्थ जन्म किंवा जन्मणे, या शब्दापासून झालेला आहे. गोव्यात एकेकाळी ‘नाताळ’ (कोंकणीत ‘नाताल’) हा शब्द सर्रासपणे वापरला जायचा; मात्र हल्ली त्याची जागा ‘क्रिसमस’ (ख्रिसमस) शब्दाने घेतलेली आहे. गोव्यात पोर्तुगीजांच्या आगमनानंतर ख्रिस्ती धर्माने इथे आपली पाळे-मुळे पसरली आणि याच काळी नाताळचा उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. या काळी ‘नाताळ’ हा शब्दच रूढ होता. साधारणपणे सतराव्या शतकानंतर ‘ख्रिसमस’ हा शब्द वापरात आला. हा शब्दसुद्धा ‘देवदूत’ अथवा ‘देवाचा प्रेषित’ या अर्थाने जन्माला आलेला आहे. ख्रिस्तीधर्मीय लोक येशू ख्रिस्ताला देवाचा दूत अथवा प्रेषित मानतात आणि 25 डिसेंबरला त्याचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस ‘नाताळ’ उत्सवाच्या स्वरूपात साजरा करतात.
येशू ख्रिस्ताला ‘जीजस ख्रिस्त’ अथवा ‘जेजू ख्रिस्त’ या नावांनीही ओळखले जाते. मराठीत येशू ख्रिस्त हे नाव जास्त रूढ आहे. त्याचा काळ हा सनपूर्व 6 ते इ.स. 43 हा होता. त्यांना ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानतात. यहुदी धर्मग्रंथात ‘मशी अह’ ही एक पदवी आहे. तिचा अर्थ ‘अभिषिक्त’ असा होतो. ग्रीक भाषेत त्या पदवीला ‘ख्रिस्तोस’ असा पर्यायी शब्द आहे, त्यावरूनच युरोपात येशूला ‘येशू ख्रिस्त’ किंवा ‘जीजस ख्रायस्ट’ म्हणतात. येशू ख्रिस्ताचा जन्म पॅलेस्टाइनमधील गॅलिलिया प्रांतातल्या नाझारेथ गावची रहिवासी मेरी हिच्या पोटी झाला. तिचे लग्न गॅलिलियामधील जोजेफ नावाच्या एका सुताराशी झाले होते. विवाहापूर्वी कुमारी अवस्थेतच मेरीला पवित्र आत्म्याद्वारे गर्भ राहिला होता. तरीही ईश्वराचा संदेश मिळाल्यामुळे जोजेफने मेरीचे पाणिग्रहण केले. विवाहानंतर जोजेफने गॅलिलिया सोडले आणि तो आपल्या पत्नीला घेऊन यहुदिया प्रांतातील बेथलेहेम नामक शहरात राहायला गेला. तिथेच येशूचा जन्म झाला. तिथला राजा हेरोद हा अत्याचारी होता. त्याच्याकडून आपल्या मुलाला उपद्रव होऊ नये म्हणून जोजेफ येशूसह बेथलेहेम सोडून ग्रीस देशात पळून गेला. हेरोद सनपूर्व 4 ला मरण पावला तेव्हा जोजेफ ग्रीसमधून परत येऊन नाझारेथ या गावी राहू लागला. इथेच येशू लहानाचा मोठा झाला. पुढे त्यांनी ‘योहान दी बाप्टिस्ट’ नावाच्या धर्मनिष्ठ व्यक्तीकडून विधीपूर्वक बाप्तिस्मा घेऊन आपले जीवन ईश्वरी कार्यासाठी समर्पित केले. तो ईश्वरी संदेशाचा प्रचार करीत सर्वत्र हिंडू लागला. धर्मोपदेश करू लागला. त्याला थोड्याच काळात खूप शिष्य मिळाले. येशू मानवतावादी धर्मप्रसार करीत होता. तो यहुदी धर्म अपूर्ण समजत होता आणि त्याला तो परिपूर्ण करायचा होता. यहुद्यांच्या धर्मशास्त्रांनी माजवलेले कर्मकांडाचे अवडंबर त्याला मान्य नव्हते. कर्मकांडापेक्षा नीती हाच खरा धर्माचा आधार आहे असे तो समजत होता आणि त्या अनुषंगाने तो उपदेश करीत होता. असे सांगतात की येशू ख्रिस्ताने कित्येक रोग्यांना आरोग्य दिले, कित्येक मृतांना जिवंत केले. त्याचे हे चमत्कार बघून सामान्य लोक त्याला प्रेषित किंवा ईश्वराचा दूत मानू लागले. आपण ईश्वराचा प्रेषित-पुत्र. आपण फक्त यहुदी लोकांच्या मुक्तीसाठी स्वर्गातून पृथ्वीवर उतरलो नाही, तर समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी- मुक्तीसाठी आलेलो आहे, असे तो सांगू लागला. तेव्हा यहुदी लोक बिथरले. यहुदी धर्मशास्त्र्यांच्या मनात भीती उत्पन्न झाली की, जर जनता येशूपदिष्ट मार्गाने जाऊ लागली, तर आपल्याला कोणी विचारणार नाही. म्हणून त्यांनी येशूला पाखंडी ठरवले आणि एवढ्यावरच न थांबता त्याला पकडून धर्ममहासभेपुढे सादर केले. त्याच्यावर धर्मद्रोहाचा खटला चालवून त्याला प्राणदंडाची शिक्षा दिली. रोमन राज्यपालाने या शिक्षेचे समर्थन केले आणि येशूला क्रुसावर चढवून, डोक्यावर काट्यांचा मुकुट घालून, हाता-पायांना खिळे ठोकून सुळी दिले. त्याही स्थितीत येशूने ‘ईश्वरा, या लोकांना क्षमा कर, ते काय करताहेत ते त्यांनाच ठाऊक नाही!’ अशी मागणी परमेश्वराकडे केली. ही शिक्षा इ.स. 30 साली एका शुक्रवारी अमलात आणली गेली. नंतर त्याचे प्रेत त्यांच्या बारा शिष्यांनी रोमन राज्यपालांच्या आज्ञेने सुळावरून काढून दफन केले. परंतु दफनाच्या तिसऱ्या दिवशी त्याची कबर रिकामी दिसली. लोकांनी येशू जिवंत झाला असे समजून तो चमत्कार मानला. त्याच्या काही शिष्यांना तो दिसल्याचे सांगतात. येशू ख्रिस्ताची ही संक्षिप्त कथा. परंतु त्याचे कार्य खूप मोठे आहे, जे या लेखात वर्णन करणे शक्य नसल्याने तो मोह टाळलेला आहे. गौतम बुद्धांनी जसा समाजाला शांतीचा- मुक्तीचा मार्ग दाखवला, दीन-दुबळ्या घटकांचे दुःख दूर करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले, तसेच येशू ख्रिस्तानेही केले. दोघेही महामानव. असे मानव परत या पृथ्वीतलावर जन्म घेणे कठीण!
सामान्य ख्रिती माणूस येशू ख्रिस्त हे मानवाच्या पोटी जन्माला आले अशी कथा गातो तरी तो त्यांना देव मानतो. हे देवत्व त्यांनी येशूना त्यांच्या दीन-दुबळ्यांच्या सेवेप्रीत्यर्थ दिलेले आहे. त्यांनी केलेल्या मानव-उद्धाराच्या कार्यामुळे आज त्यांची जयंती जगभर एक सण म्हणून साजरा करतात.
गोव्यातील नाताळ सणाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा सण येथील मातीशी जुळलेल्या खास प्रथा-परंपरा पाळून, त्याचबरोबर चर्चशी संबंधित कर्मकांडे करून साजरा केला जातो. ख्रिस्ती समाजातील सर्व सणांमध्ये ‘नाताळ’ हा सर्वात मोठा सण. हिंदूची दिवाळी होताच ख्रिस्ती बांधवांना नाताळचे वेध लागतात. त्यांनाच कशाला गोव्यात हिंदू बांधवसुद्धा नाताळची वाट पाहत राहतात. याचे मुख्य कारण म्हणजे, गोव्यातील हिंदू आणि ख्रिस्ती समाजांमधील भावबंधकीचे नाते! आणखी एक कारण म्हणजे, नाताळ हा दिवाळीसारखाच दिव्यांचा उत्सव आहे. या उत्सवात गाव, शहरे, नगरे… सारी प्रकाशात उजळून जातात. मन प्रसन्न होते. वातावरणातील तिमिराबरोबरच मनातील तिमिरही दूर पळून जातो. जगण्याच्या नव्या आशा मनात जिवंत होतात. उत्साह आणि उल्हासाने मन प्रफुल्लित होते.
नाताळाच्या पंधरा दिवस आधीच बाजारपेठा सजावटीच्या, रोषणाईच्या, खाद्यपदार्थांच्या सामानाने सजतात. लोकांची सामान खरेदी करायला बाजारात गर्दी लोटते. गरिबातला गरीबसुद्धा आपल्या खर्चाला काही महिने कात्री लावून हे सामान खरेदी करण्यासाठी पैसे साठवून ठेवतो आणि मग बाजारातून आपली खरेदी करतो. या दिवसांत सांताक्लॉजच्या लाल टोप्या, लाल अंगरखे बाजारपेठेत जिथे-तिथे लटकलेले दिसतात, ज्यामुळे नाताळाचे वातावरण तयार व्हायला मदत होते. हल्ली ख्रिसमस ट्री, गोठे अथवा ख्रिस्तजन्माचे देखावे गावोगावी आणि घरोघरी तयार केलेले दिसतात. ते बनवण्याच्या स्पर्धासुद्धा आयोजित केल्या जातात. चर्चमध्ये ‘कॅरोल’ गायनाच्या तालमी सुरू होतात. घरांची डागडुजी, साफसफाई, रंगरंगोटी तर महिनाभर आधीच सुरू झालेली असते. नवे कपडे, पादत्राणे, दागिने इत्यादींची खरेदी होते. परदेशांत राहणाऱ्यांना गावघरी येणासाठी नाताळाच्या सणासारखे दुसरे मोठे निमित्त नसते. नाताळच्या आदल्या दिवशी किंवा नंतर सांताक्लॉज आसपासच्या घरांना भेटी देतो, मुलांना खाऊ-चॉकलेट्स वाटतो. मात्र गोव्यात हा सांताक्लॉज पूर्वी नव्हता. त्याचे आगमन या वीस-पंचवीस वर्षांत झालेले आहे.
नाताळ म्हणजे दारात नक्षत्र पेटवायलाच हवे. आधी लोक स्वतः घरी नक्षत्र बनवायचे. बांबूच्या काड्या बांधून नक्षत्राची आकृती तयार करून, रंगी-बेरंगी कागद लावून ते सजवायचे आणि त्यात तेलाचा दिवा (पणटी) पेटवून ठेवायचे. आज रेडिमेडच्या युगात तऱ्हेतऱ्हेच्या आकाराची, प्रकाराची नक्षत्रे बाजारात मिळतात. लोकांच्या खिशालाही ती परवडतात. त्यामुळे एक-एकाच्या दारात कितीतरी नक्षत्रे टांगलेली दिसतात. गोव्यात असे काही लोक आहेत जे संकल्प करून दोन हजार- अडीच हजार (कदाचित जास्तही असेल) नक्षत्रे दारात टांगतात. नक्षत्रे टांगण्यामागे एक कथा लोकमानसांत रूढ आहे, ती म्हणजे, जगाचे तारण करणारा बालक म्हणजे येशू जन्माला आलेला असल्याची बातमी तीन यहुदी राजांना समजते. ते त्याच्या शोधार्थ निघतात तेव्हा त्यांना आकाशातील एक तारा म्हणजे नक्षत्र मार्ग दाखवते. त्याची आठवण म्हणून नाताळच्या दिवशी दारात नक्षत्र पेटवण्याची प्रथा आहे. हे नक्षत्र 6 जानेवारीपर्यंत ठेवतात. कारण 6 जानेवारीला या तीन राजांची मोहीम सफल झाली होती.
एकेकाळी गोव्यात नाताळ म्हणजे करंजी असे समीकरण झालेले होते. करंजीला कोंकणी भाषेत ‘नेवरी’ म्हणतात. ती नसेल तर नाताळ अपूर्ण. नाताळच्या आठ दिवस आधीच करंज्या बनवण्यासाठी बायामाणसांची लगबग सुरू होते. त्यात शेजारपाजारच्या मित्र-परिवारातील हिंदूंना करंज्या द्यायच्या आहेत म्हणजे मग त्या हिंदू बायकांकडूनच केल्या जायच्या. काही वर्षांआधी त्या ज्यांना द्यायच्या असायच्या त्यांना देण्याचे काम हिंदू कुटुंबाकडेच सोपवले जायचे. आज एखादा अपवाद सोडला तर हे ओवळे-सोवळे इतिहासात जमा झाले आहे. आज हिंदू मित्र-मंडळी नाताळच्या दिवशी मनमोकळेपणाने ख्रिस्ती मित्रांच्या घरी भेट देतात. त्यांनी बनवलेले पदार्थ सेवन करतात. करंज्याव्यतिरिक्त नाताळचे पारंपरिक खाद्यपदार्थ म्हणजे ः बेबींक, दोदल, पिनाग्र, मांडारे, वडे, करमलां, दोश, बुलिनां, घोशे, बातक, केक आदी. हे सारे जिन्नस आधी घरी बनवले जायचे. ते बनवण्यात घरच्या स्त्रियांना आनंद वाटायचा. आजही काही लोक ते घरी बनवतात, तर काही बेकरी अथवा इतर दुकानांतून विकत आणतात.
एकेकाळी नाताळच्या दिवसांत हुडहुडी आणणारी थंडी असायची. हल्लीच्या वर्षांत निसर्गाचे ऋतुचक्र बदलेले आहे, त्यामुळे किंचित थंडी असते. यंदाही तीच स्थिती असेल असा तर्क करता येतो.
नाताळ 25 डिसेंबरला असला तरी या सणाची लगबग 24 तारखेच्या दुपारपासूनच सुरू होते. सजावट, रोषणाई झाली, मिठाईचे जिन्नस तयार झाले की मग चर्चमध्ये जाण्याची तयारी सुरू होते. साधारणपणे रात्रीच्या दहा-अकराच्या सुमाराला नवीन पेहराव घालून स्त्री-पुरुष, मुलं, जाणती-नेणती चर्चमध्ये जायला निघतात. चर्चमध्ये खास ‘मीस’ असते. येशूचा जन्म रात्री पहिल्या प्रहरला झाला होता, म्हणून त्यावेळी प्रार्थना केली जाते. स्तुतिगीते गायली जातात. चर्चमधून घरी आल्यावर फटाके वगैरे लावून येशूच्या जन्माचा आनंद व्यक्त केला जातो. काही वर्षांआधी 24 तारखेला रात्री गावातील स्त्री-पुरुष एकत्र येऊन गाणी गात रस्त्यावरून चालत चर्चमध्ये जायचे. तसेच परत गाणी गात यायचे. आज हे दृष्य दुर्मीळ झाले आहे. त्याची जागा आज डान्स, पार्ट्या, संगीतरजनी अशा कार्यक्रमांनी घेतली आहे. काही परिसरात तियात्रांचे खास आयोजनही केले जाते.
आज जगभर जिथे-जिथे ख्रिस्ती धर्म जगतो आहे तिथे-तिथे ख्रिस्त जयंती म्हणजे नाताळचा उत्सव साजरा केला जातो. गोव्यातील ख्रिस्ती बांधव पण हा सण भक्तिभावाने साजरा करतात. या साऱ्यांकडून एक अपेक्षा की, या सणाचा नुसताच आनंद न घेता, येशू ख्रितांनी दिलेल्या मानवतेच्या शिकवणीचे सदैव पालन व्हावे!
सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा!