कित्येक वर्षापासून वाट पहात असलेल्या सुरावली ते बाणवली या 2.75 किलोमीटर मडगाव पश्चिम बगल मार्गाचे उद्घाटन आज सोमवार दि. 23 रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे बगल रस्त्याचे उद्घाटन करतील. या बगल रस्त्याच्या उद्घाटन सोहळ्याला आधी केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी येणार असल्याचे जाहीर झाले होते पण ते काही कारणामुळे येऊ शकणार नाहीत. त्यामुळे या मार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, दक्षिण गोवा खासदार कॅ. विरिआतो फर्नांडिस, मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगश, मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
सुरावली ते बाणावलीपर्यंतच्या 2.75 किलोमीटर बगल मार्गावरील पुलाला 250 कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे. दरम्यान, सुरावली येथील घाऊक मासळी बाजाराच्या बाजूने हा उद्घाटन सोहळा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.