खाजन शेती, जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी 1500 कोटी द्या

0
1

>> केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व बैठकीत मुख्यमंत्र्यांची निर्मला सीतारमण यांच्याकडे मागणी

गोव्यातील खाजन शेती, जुन्या जलवाहिन्या बदलणे या दोन्ही कामांसाठी सुमारे 1500 कोटी रुपयांचा खास निधी उपलब्ध करण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे काल केली. राजस्थानमध्ये आयोजित केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व बैठकीत ही मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ह्या बैठकीत सहभाग घेऊन गोवा राज्याचे आर्थिक साहाय्याबाबत एक निवेदन सादर केले. राज्याच्या भांडवली गुंतवणुकीसाठी खास योजना कायम ठेवाव्यात. राज्यात सुमारे 18 हजार हेक्टर खाजन शेती आहे. खारे पाणी या खाजन शेतीमध्ये घुसत असल्याने शेती पडीक ठेवावी लागत आहे. खाजन शेतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली.

गोवा राज्यातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी सुमारे 1 हजार कोटीचे साहाय्य करावे. जलवाहिन्यांना 60 ते 70 वर्षे पूर्ण झाल्याने त्यातून पाण्याचा अपव्यय होत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

गोव्यातून बंगळूर, पुणे, हैदराबाद अशा प्रमुख शहरामध्ये रेल्वे कनेक्टिविटी वाढवावी. गोव्यातून शहरात जाण्यासाठी सुपरफास्ट, वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध करावी. कोकण रेल्वे मार्गाचे आधुनिकीकरण करावे, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

15 व्या वित्त आयोगाने शिफारस केलेले पर्यटनासाठीचे 200 कोटी रुपये अनुदान आणि हवामान बदलासाठीचे 500 कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली. हवामान बदल आणि आपत्ती कमी करण्यासाठी साधनसुविधा उभारण्यासाठी खास आर्थिक साहाय्य करण्याची मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांचा खासगी चार्टर विमानातून प्रवास

केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व बैठकीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे खासगी चार्टर विमानातून राजस्थानला काल रवाना झाले होते. त्यांच्यासमवेत आमदार दाजी साळकर, आमदार जीत आरोलकर आणि प्रेमेंद्र शेट हे देखील होते.