>> मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती
>> मांडवीतील कॅसिनोंना मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ
गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 6 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. मांडवी नदीतील कॅसिनोंना येत्या मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 6 फेब्रुवारीपासून राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीबाबत पुढील काही दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
तरंगत्या कॅसिनोंना मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ
राज्य सरकारकडून मांडवी नदीतील कॅसिनोंना दर सहा महिन्यांनी मुदतवाढ दिली जाते. तथापि, यावेळी थेट मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅसिनोना देण्यात आलेली ही मुदतवाढ अंतिम स्वरूपाची आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. मांडवी नदीमध्ये सहा तरंगते कॅसिनो कार्यरत असून या कॅसिनेोंंच्या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सरकारकडून कॅसिनोंना मुदतवाढ दिली जात आहे. राज्य सरकारने मांडवी नदीतील कॅसिनोंचे स्थलांतर करण्यासाठी चार ठिकाणी प्रयत्न चालविला होता. तथापि, मांडवीतील कॅसिनोंचे स्थलांतर करण्यात यश प्राप्त झालेले नाही.
वित्त आयोग जानेवारीत गोव्यात
16 वा वित्त आयोग येत्या 9 आणि 10 जानेवारी 2025 रोजी गोव्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. हा आयोग मंत्रिमंडळ सदस्य, अधिकारी, पंचायत आणि जिल्हा पंचायत सदस्य, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी इत्यादींशी महत्त्वाच्या आर्थिक बाबींवर आणि राज्याला संसाधनांचे वाटप करण्याबाबत चर्चा करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
कदंबच्या तिकीटदरात 10 टक्के सवलत
कदंब महामंडळाने राज्यातील कदंब बस प्रवाशांसाठी स्मार्ट ट्रान्झिट कार्ड सुविधा उपलब्ध केली आहे. या कार्डाचा वापर करणाऱ्या प्रवाशाला तिकीट दरात 10 टक्के सवलत दिली जाणार आहे. राज्यातील कदंब आणि माझी बस योजनेखालील बसगाड्यांत या कार्डाचा वापर केला जाई शकतो, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. पणजी स्मार्ट सिटी बससाठी स्मार्ट कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आता, कदंबाच्या सर्व बसगाड्यांना ही सुविधा लागू केली जात आहे. हे कार्ड 150 रुपये एकवेळ भरून खरेदी करता येते. कार्ड वापरून खरेदी केलेल्या प्रत्येक तिकिटावर 10 टक्के सवलतदेखील दिली जाणार आहे. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकही एसटीसीवर 50 टक्के सवलत घेऊ शकतात. अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहासाठी आयुर्वेदिक फिजिशियन व होमिओपॅथिक डॉक्टर नियुक्त करण्यात मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.