व्हायरल व्हिडिओप्रकरणी सुनील कवठणकर यांची 2 तास चौकशी

0
2

जुने गोवे पोलिसांनी सराईत गुन्हेगार सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांची काल जवळपास 2 तास चौकशी केली.

सराईत गुन्हेगार सिद्दिकी खान याने पाठविलेले व्हिडिओ सुनील कवठणकर यांनी रविवारी रात्री सार्वजनिक केले होते. या व्हिडिओबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जुने गोवे पोलिसांनी सुनील कवठणकर यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस जारी केली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी ते जुने गोवे पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर झाले. पोलिसांनी कवठणकर यांना सिद्दिकीच्या व्हायरल व्हिडिओप्रश्नी विविध प्रश्न विचारले.

सिद्दिकीचा व्हिडिओ व्हायरल करण्यापूर्वी रविवारीच आपण पोलीस महासंचालकांना त्याबाबत माहिती दिली होती, असे सुनील कवठणकर यांनी पोलीस चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना काल सांगितले. व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह पोलिसांकडे दिला असून, तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. सिद्दिकी पलायन प्रकरणी पोलिसांवर दबाव असून, चौकशीद्वारे विरोधकांची सतावणूक होत असल्याचा आरोप सुनील कवठणकर यांनी केला.

सिद्दिकीचा व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह रविवारी मला मिळाला. त्याचवेळी पोलीस महासंचालकांना फोनवरून मी व्हिडिओची माहिती दिली. पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) शर्मा फोन करतील, असे त्यांनी सांगितले होते. व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर शर्मा यांनी फोन करून एक पोलीस व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह नेण्यास येणार असल्याचे सांगितले. यानंतर रात्री उशिरा पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर हे पेन ड्राईव्ह नेण्यास घरी आले. त्यावेळी मी झोपी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष मीच व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह पोलिसांना दिला, असे सुनील कवठणकर यांनी सांगितले. यावेळी आपचे वाल्मिकी नाईक, काँग्रेसचे तुलियो डिसोझा व इतरांची उपस्थिती होती.

कवठणकर काय म्हणाले?
पोलिसांनी आपल्याकडे मोबाईलचीही मागणी केली होती; मात्र मोबाईल देण्यास आपण नकार दर्शवला. अटकपूर्व जामिनासाठी आपण अर्ज करणार नसून, अटकेस सामोरे जाण्याची माझी तयारी आहे, असे सुनील कवठणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
सिद्दिकीने पोलिसांसह एका आमदारावरही आरोप केलेला आहे. त्या पोलीस किंवा आमदारांची चौकशी न करता विरोधकांची चौकशी होत आहे. पोलीस दबावाखाली तपास करत करीत आहेत, असा आरोप कवठणकर यांनी केला.

उद्या अमित पालेकरांची चौकशी
सिद्दिकीच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी सुनील कवठणकर यांची चौकशी केल्यानंतर जुने गोवे पोलीस आता आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांची चौकशी करणार आहेत. त्यासाठी गुरुवार दि. 19 डिसेंबरला सकाळी 11 वाजता पोलीस स्थानकात हजर राहण्याची नोटीस पालेकरांना बजावण्यात आली आहे.