>> सरकारी नोकरी घोटाळ्यात हात असल्याचा दिल्लीतील पत्रकार परिषदेत केला होता आरोप
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी आणि भाजप नेत्या सुलक्षणा सावंत यांनी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांच्यावर डिचोली येथील दिवाणी न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
संजय सिंह यांनी दिल्ली येथे गेल्या 4 डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुलक्षणा सावंत यांचा ‘कॅश फॉर जॉब’ म्हणजेच सरकारी नोकरी घोटाळ्यात हात असल्याचा व सरकारी नोकऱ्यांसाठी जी कोट्यवधी रुपयांची लाच घेतली गेली, त्यात त्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. या घोटाळ्यातील सुलक्षणा सावंत ह्या एक प्रमुख आरोपी असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर काल सुलक्षणा सावंत यांनी संजय सिंह यांच्याविरुद्ध हा 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा गुदरला आहे, अशी माहिती काल भाजप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संजय सिंह यांनी सुलक्षणा सावंत यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, ते सर्व आरोप खोटे, निराधार व बिनबुडाचे असून, यासंबंधी संजय सिंह यांच्यावर कारवाई केली जाईल, असे भाजपने यापूर्वीच स्पष्ट केले होते. वेळप्रसंगी या प्रकरणी त्यांना न्यायालयातही खेचले जाईल, असे भाजपने स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर काल सुलक्षणा सावंत यांनी संजय सिंह यांच्याविरुद्ध डिचोली येथील दिवाणी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा गुदरला, असे वेर्णेकर यांनी सांगितले.
गिरीराज पै वेर्णेकर काय म्हणाले?
या प्रकरणी डिचोली येथील दिवाणी न्यायालयाने संजय सिंह यांनी मंगळवारी नोटीस पाठवली असल्याची माहिती देखील गिरीराज पै वेर्णेकर यांनी दिली.
संजय सिंह हे राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करण्यात आघाडीवर असून, त्यांनी यापूर्वी भाजपचे नेते अरुण जेटली व नितीन गडकरी यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते व नंतर त्याबाबत न्यायालयासमोर माफीही मागितली होती, असे वेर्णेकर म्हणाले.