- डॉ. मनाली महेश पवार
मुलांचे पालनपोषण, त्यांचा आहार, त्यांचे शिक्षण, घरातल्या इतर सदस्यांचे जेवणखाण, घरातील साफसफाई, बाजारहाट, सण-समारंभ इत्यादींचे व्यवस्थापन करता करता स्वतःकडे बघायला स्त्रीला वेळच नसतो. निरोगी, स्वस्थ स्त्री ही घर-संसाराची नीव असते. तिच्या खांद्यावर संपूर्ण घराचा डोलारा असतो, व तो डोलारा लीलया पेलण्याची शक्ती तिला तेव्हाच मिळेल जेव्हा ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ असेल.
गोंधळलेली मालिनी धापा टाकत, घामाने डबडबलेली अशी दवाखान्यात आल्यावर जराही उसंत न घेता डॉक्टरना सांगायला सुरुवात करते- ‘डॉक्टर! हल्ली माझी चिडचिड खूप वाढली आहे, राग राग होतो. पाळीही अनियमित येते, पचनही चांगले होत नाही, भूक कधी लागते कधी लागत नाही, सारखा कसला ना कसला ताण… जीवनात काही स्वारस्य असे वाटत नाही.’ अशी ही मालिनी सर्वसाधारणपणे प्रत्येकजणीमध्ये व सगळ्यांच्या घरात सध्या बघायला मिळते.
खरं तर स्त्री म्हणजे जगत् जननी, स्त्री म्हणजे आदिशक्ती, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे प्रेम, स्त्री म्हणजे प्रेरणा, स्त्री म्हणजे पराक्रम, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री प्रयत्नांना लाभलेली उन्नती, स्त्री म्हणजे प्रगती, अशा स्त्रीच्या विविध छटा… आजी, आई, मावशी, काकी, मुलगी, बहीण, आत्या, पत्नी अशा विविध रूपांत स्त्री आपले कर्तव्य न थकता पार पाडीत असते. पण स्त्री तेव्हाच खंबीरपणे ही सर्व कर्तव्ये पार पाडेल जेव्हा ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असेल, निरोगी असेल. निरोगी, स्वस्थ स्त्री ही घर-संसाराची नीव असते. तिच्या खांद्यावर संपूर्ण घराचा डोलारा असतो, व तो डोलारा लीलया पेलण्याची शक्ती तिला तेव्हाच मिळेल जेव्हा ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ असेल.
सद्यस्थितीत ‘मी गृहिणी आहे’ असे सांगणाऱ्या स्त्रिया क्वचितच. कारण मुली चांगल्या शिकतात, पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. घर-संसार सांभाळण्यासाठी नोकरी-व्यवसाय करतात. या नोकरदार स्त्रियांचे जीवन म्हणजे अगदीच तारेवरची कसरत. ‘स्त्री’ म्हटले की चूल व मूल काही चुकलेले नाही! मुलांचे पालनपोषण, त्यांचा आहार, त्यांचे शिक्षण, घरातल्या इतर सदस्यांचे जेवणखाण, घरातील साफसफाई, बाजारहाट, सण-समारंभ इत्यादींचे व्यवस्थापन करता करता स्वतःकडे बघायला तिला वेळच नसतो; आणि यातूनच मग आरोग्याच्या बारीकसारीक तक्रारी सुरू होतात अन् बायका त्या सोयिस्कररीत्या नजरेआड करतात.
आज स्त्रिया आपली भूमिका पार पाडताना- कौटुंबिक आणि सामाजिक जीवन जगताना- सतत वाकलेल्या व तणावग्रस्त वाटतात. त्या अनेक भूमिका साकारताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कुटुंबाचे आरोग्य व्यवस्थापित करताना, तेवढेच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित केल्यास महिलांच्या असाध्य अशा कितीतरी वेदना, आजार वेळीच लक्षात येऊन पुढचा अनर्थ टाळता येतो.
आधुनिक जगात स्त्रिया त्यांच्या आरोग्याबाबत काहीशा जागरूक आहेत. परंतु कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, आपली स्वप्ने पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत, करिअर घडविण्यात त्या अनेकदा आरोग्याच्या काही गंभीर चुका करतात.
महिलांच्या आरोग्याच्या सामान्य चुका
रक्तदाब ः स्त्रियांमध्ये एक सामान्य गैरसमज आहे की कमी आणि उच्च रक्तदाबाचे संकेत ओळखणे सोपे आहे. ‘मला जास्त चक्कर यायला लागली, थकवा जाणवू लागला की लगेच समजते की बीपी वाढलेला आहे, कमी झालेला आहे. सत्य हे आहे की, हा बीपी कमी-जास्त होणे हा एक मूक रोग आहे. महिलांना हृदयरोगाचा त्रास होत नाही हा एक मोठा गैरसमज आहे. हायपरटेन्शन, हायपोटेन्शन यांकडे नजरअंदाज करू नका. पुढे हृदयविकार उद्भवण्याची ही घंटा आहे असे समजा.
अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे मेंदूतील रक्तस्राव जलद होऊन रक्तवाहिनी फुटू शकतात किंवा रक्त गोठण्यास कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका वा ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो.
योनीचे आरोग्य
योनीगत श्वेत स्राव व विस्फोट खाज यांसारख्या सामान्य वाटणाऱ्या पण गंभीर लक्षणांकडे स्त्रिया बऱ्याच वेळा लाजेपोटी दुर्लक्ष करण्याची मोठी चूक करतात. स्वतःच्या डोक्याने किंवा गुगल वेबसाईटच्या मदतीने विविध क्रिम, योनिधावन स्वतःच वापरतात, ज्याचा पुढे विपरित परिणाम होऊ शकतो. गर्भनिरोधक उत्पादने जसे की डायाफ्राम, ग्रीवाच्या टोप्या, टॅम्युन्स इ. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय, योग्य मार्गदर्शन न घेता वापरल्याने योनीमार्गात जळजळ व संक्रमण होते.
पीसीओडी किंवा पीसीओएस
सगळ्या वयोगटात यांचा लक्षण-समुच्चय आढळतो. यामधूनच फॅटी लिव्हर, लठ्ठपणा, मधुमेह यांसारखे विकार उद्भवतात व यातूनच वंधत्वाचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. अयोग्य, आहार-विहार व तणावग्रस्त जीवनशैली या महत्त्वाच्या चुका स्त्रियांमध्ये घडत आहेत.
रजोनिवृत्तीचा काळ
हा काळ आता महिलांच्या स्वतःच्याच काही चुकांमुळे अलीकडे अगदी चाळिशीकडे पोचला आहे. रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना झोपेचा त्रास, योनीमार्गाचा कोरडेपणा, लघवीचा त्रास, भरपूर घाम यांसारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र त्यांना नैसर्गिक समजून सहन करण्याची चूक करू नये. योग्य समुपदेशन, व्यवस्थापन, योग्य आहार-विहार, योग साधनांचा वापर केल्यास रजोनिवृत्तीचा काळही सुखकर जाऊ शकतो.
पचनसंस्थेकडे दुर्लक्ष
भूक न लागणे, जास्त भूक लागणे, मलावरोध, वारंवार संडास, पोट फुगणे, म्लान वाटणे या सगळ्या लक्षणांकडे बऱ्याच महिला सामान्य समजून दुर्लक्ष करतात व यातूनच मग गंभीर पचनसंस्थेच्या रोगामध्ये त्यांचे परिवर्तीत होते. अवेळी खाणे-पिणे आणि तसेच नैसर्गिक विधी, उदा. लघवी, संडास इत्यादींचे धारण करणे ही महिलांची पचनसंस्था बिघडण्याची महत्त्वाची कारणे आहेत.
पायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष
सतत उभे राहून काम करत राहण्याने किंवा चुकीच्या बसण्याच्या, काम करण्याच्या पद्धतीमुळे पायांचे दुखणे, कंबरदुखीसारख्या सामान्य वाटणाऱ्या वेदना सहन कराव्या लागतात. पण ही दुखणी सायटिका, मणक्यांमधील गॅपसारख्या आजारांना आमंत्रण असू शकते. अशी काही वर दिल्याप्रमाणे चिंताजनक चिन्हे असतात, जी वेळीच ओळखणे गरजेचे असते.
काही आवश्यक चाचण्या
गर्भारपणात रक्ताच्या चाचण्या, सोनोग्राफी, एक्स-रे इ. चाचण्या कराव्या लागतात. पण काही चाचण्या साधारण पस्तीशीनंतर ह्या कराव्याच लागतात. वर्षातून एखादा दिवस- मग तो स्वतःचा वाढदिवस का असेना- तो दिवस ठरवून तपासण्या करून घ्या.
डॉक्टरांकडून संपूर्ण शरीर तपासणी, वजन, रक्तदाब, बॉडी मासज, इन्डक्स, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर उपाशीपोटी व जेवणानंतर दोन तासांनी, किडनी व लिव्हर फंक्शन टेस्ट, लिपिड प्रोफाईल, थायरॉईड टेस्ट, त्याचबरोबर पॅप, स्मिअर टेस्ट, सोनाग्राफी, स्तनाचा एक्स-रे, मॅमोग्राफी या चाचण्या महिलांनी करून घ्याव्यात.
महिलांचा आहार कसा हवा?
स्त्री-रुग्णाला नेहमी हे तीन प्रश्न विचारा- किती खाता? काय खाता? केव्हा खाता? या प्रश्नांची उत्तरे अशी मिळतील- दोनदाच जेवतो, उपाशीपोटी कामाला जातो, खायला वेळच मिळत नाही. बाहेर खाणे, फास्ट फूड, झटपट खाणे जास्त प्रमाणात होते. शिळे अन्न, फ्रिजमधील अन्न स्वतःच खाते. दूध/ताक आवडतच नाही. चहा मात्र वारंवार पितो. ब्रेड, नुडल्स जास्त खातो. फळे खातच नाही. चिकन-मटणसारखे व्यवस्थित शिजायला हवे असे अन्नपदार्थ तळून किंवा तेलातच शिजवून खातो. डायटच्या नावाखाली कच्चे सॅलेड जास्त प्रमाणात खाते. एकूणच काय तर कमी वेळात तयार होणारे अन्नपदार्थ व जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थच जास्त खाण्यात येतात. मग यातून आरोग्याच्या तक्रारी निर्माण होणारच ना?
महिलांसाठी आरोग्याचे साधे नियम
भूक लागली असता चहा-कॉफीने ती भागवू नये. सकाळी घरून निघताना नाश्ता करूनच बाहेर निघावे. नाश्त्यामध्ये विविध भाज्या घालून व विविध धान्यांची पिठे वापरून तयार केलेले थालिपीठ हे सध्या बेस्ट ऑपशन आहे. त्यासोबत ताक प्यावे. त्याचबरोबर विविध भाज्या वापरून उपमा, डोसा हेही नाश्त्यासाठी उत्तम आहेत. रात्री भिजत घातलेले बदाम व खारीक, मनुका, शेंगदाणे सकाळी खावेत. याने शरीराला ताकत मिळते.
रोज त्या-त्या ऋतूत व त्या-त्या स्थळात पिकणारी फळे खावीत. फळांनी किंवा फळरसांनी शरीर व मन ताजेतवाने होते.
दुपारच्या डब्यात बऱ्याच महिला भात, आमटी थंड होत असल्याने नेत नाहीत. त्यामुळे दुपारच्या डब्यात एखादी फळभाजी, उसळी, चपाती किंवा भाकरी न्यावी. त्याचबरोबर सॅलेड, तोंडी लावणीला चटणी किंवा घरचे बनवलेले लोणचे, त्याचबरोबर ताक सेवन करावे. संध्याकाळी चहाबरोबर वडापाव, सामोसा, कचोरी, खाण्यापेक्षा एखादं फळं सोबत घेऊन जावे व ते खावे.
रात्रीच्या जेवणात वरण-भात, तूप मेतकुट भात, खिचडी पुलाव (विविध भाज्या घालून) असा पूर्ण पोषक तत्त्वे देणारा पण पचायला हलका असा व करायलाही सोपा असा आहार सेवन करावा. मांसाहारी व मासे खाणाऱ्यांनी रात्रीच्या जेवणात बदल करावेत. आवडीचे तळणीचे पदार्थ सुट्टीच्या दिवशी प्लॅन करावे. आहाराबरोबरच साधा हलका-फुलका व्यायाम, 30 मिनिटे चालणे, सकाळी 13 सूर्यनमस्कार, वेळ मिळेल तसे दीर्घश्वसन, प्रत्येक नवीन काम सुरू करण्यापूर्वी प्राणायाम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचे व्यवस्थापन व तेदेखील लिखित स्वरूपात करावे.
घरातील प्रत्येकाला त्याच्या-त्याच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी व कामे वाटून घ्यावी. पुरुषांप्रमाणे तुम्हालाही दोनच हात आहेत. मल्टिटास्कींग वुमन- नवदुर्गा होण्याची गरज नाही. आपले आरोग्य हीच धनसंपदा आहे. त्यामुळे महिलांनो, आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्या.