सिद्दिकीने केलेल्या आरोपांची चौकशी करा

0
3

>> व्हायरल व्हिडिओेवरून काँग्रेस व आम आदमी पक्ष आक्रमक; सिद्दिकीने नाव घेतलेल्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी

जमीन घोटाळ्यातील फरार आरोपी सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याच्या व्हायरल व्हिडिओमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, त्याने गोवा पोलीस आणि एका आमदारावर केलेल्या आरोपांवरून काँग्रेस व आम आदमी पक्ष हे विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. सिद्दिकीने व्हिडिओतून जे आरोप केलेले आहेत, त्या आरोपांची विनाविलंब चौकशी करावी, तसेच त्याने ज्या पोलिसांच्या नावांचा उल्लेख केलेला आहे, त्या पोलिसांची स्वतंत्र यंत्रणेद्वारे चौकशी केली जावी, अशी मागणी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या एका संयुक्त शिष्टमंडळाने काल गोव्याचे पोलीस महासंचालक आलोककुमार यांची भेट घेऊन केली. याशिवाय सिद्दिकीने सर्व आरोपांची न्यायालयीन चौकशी करावी. तसेच, त्याने नावे घेतलेल्या पोलिसांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल केली.

रायबंदर येथील गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीतून पोलीस शिपायाच्या मदतीने पळून गेलेल्या सिद्दिकीचा चार दिवसानंतरही अद्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही. गोवा पोलीस खात्याची पथके कर्नाटकातील विविध भागांत त्याचा शोध घेत आहेत. तथापि, त्याला ताब्यात घेण्यात यश प्राप्त झालेले नाही.

13 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 2.30 च्या सुमारास सिद्दिकी खान हा ड्युटीवरील पोलीस शिपाई अमित नाईक याच्यासोबत गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीतून बाहेर पडून फरार झाला. त्यादिवसापासून पोलीस यंत्रणा त्याचा शोध घेतला जात आहे. त्याच दिवशी रात्री अमित नाईक हा हुबळी पोलिसांना शरण आला. त्यानंतर, जुने गोवे पोलिसांनी त्याला अटक केली होती. याशिवाय सिद्दिकीला हुबळीतून पुढे पळून जाण्यासाठी कार उपलब्ध करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली होती.

या प्रकारानंतर, रविवार 15 डिसेंबरला रात्रीच्या वेळी काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी सिद्दिकीने पाठविलेले काही व्हिडिओ पत्रकार परिषदेत जारी केले. त्या व्हिडिओतून सिद्दिकीने गोवा पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

सुनील कवठणकरांना चौकशीसाठी हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश
जुने गोवे पोलिसांनी गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीतून पलायन केलेल्या सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान प्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेसचे नेते सुनील कवठणकर यांना मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जुने गोवे पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस जारी केली आहे. सिद्दिकीने आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांच्या निवासस्थानी पाठविलेल्या व्हिडिओ काँग्रेसचे नेते सुनील कवठणकर यांनी रविवारी जारी केल्याने खळबळ उडाली होती.

‘त्या’ पोलिसांना निलंबित करा

काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची मागणी

जमीन घोटाळ्यातील संशयित आरोपी सिद्दिकी खान याने केलेल्या सर्व आरोपांची न्यायालयीन चौकशी करावी. तसेच, त्याने नावे घेतलेल्या पोलिसांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार आल्टन डिकॉस्टा यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली.

सिद्दिकीने व्हिडिओमध्ये केलेले आरोप गंभीर आहेत. सिद्दिकी पलायन प्रकरणामध्ये समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. पोलीस खात्यातील 12 पोलिसांनी आपल्याला पळून जाण्यास मदत केली हा सिद्दिकीने केलेला अतिशय गंभीर आहे. एका आमदाराने धमकी देऊन जमीन हस्तांतरित करण्यास सांगितले होते, असा आरोपही त्याने केला आहे. तसेच त्याने आरोप केलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी पाटकर यांनी केली. आरोपी गोव्याच्या बाहेर पळून जाताना हद्दीवरील पोलीस काय करीत होते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जनतेचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास उडत चालला आहे, असेही पाटकर यांनी सांगितले. दरम्यान, गोवा पोलिसांकडून सुनील कवठणकर यांची पोलिसांकडून सतावणूक केली जात आहे, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

सर्वांची मिलीभगत : आलेमाव
पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगार यांच्यातील संगनमत पुन्हा एकदा उघड झाले आहे. केवळ एकच आमदार नव्हे, तर अन्य काही सत्ताधारी आमदार, मंत्री जमीन घोटाळ्यात गुंतलेले असावेत, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. गोव्यात गुंडाराज सुरू असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय असे प्रकार घडू शकत नाहीत, असा दावा आलेमाव यांनी केला.

‘त्या’ वेळचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज जारी करा
गुन्हा अन्वेषण विभागाच्या संपूर्ण आवारातील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करावी. विशेषत: सिद्दिकी खान पळून जाण्याच्या प्रकाराच्या तीन दिवस आधीची पोलीस अधीक्षकांच्या केबिनच्या आजूबाजूचा परिसराची सीसीटीव्ही फुटेज जारी करावी. तसेच, पणजी ते पोळे आणि हुबळीमार्गे दांडेली प्रवासाची माहिती उघड करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी केली.